Weather Update: दररोज बदलत असणाऱ्या हवामानामुळे आता येत्या काही दिवसांत देशातील काही ठिकाणी तापमानात असामान्य वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
दिल्लीसह अनेक राज्यात रिमझिम पाऊस आणि वादळी हवामानामुळे वातावरण थोडे थंड राहिले. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2023 हा महिना गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे.
मार्चच्या पहिल्या दिवशी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी विखुरलेला पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडला. त्यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात दिवसाचे तापमान कमी झाले आहे.
2 मार्च रोजी हवामान निरभ्र होण्याची शक्यता आहे. 2 मार्चपासून दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होणार आहे. उत्तर भारतात ढगांच्या आच्छादनामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये बहुतांश ठिकाणी आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला.
यासोबतच उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असूनही, पश्चिम राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी किमान तापमान 5 अंश सेल्सिअसने सामान्यपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 5 अंश सेल्सिअस किंवा सामान्यपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.