Weather Forecast: मागच्या काही दिवसांपासुन देशाची राजधानी दिल्लीसह इतर राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीतील अनेक भाग जलमय झाले आहेत. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने दिल्लीतील अनेक भागात पाणी शिरले आहे. तर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, IMD ने आज म्हणजेच 15 जुलै रोजी राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय 50 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला असून, काही भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार काही दिवस पावसाला विश्रांती मिळणार नाही. येत्या काही दिवसांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा प्रकोप पाहायला मिळू शकतो. IMD च्या मते, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे.
या राज्यात मुसळधार पाऊस
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 15 जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी. याशिवाय उत्तराखंडमध्ये रविवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने पिलीभीत, बरेली, लखीमपूर खेरी, शाहजहांपूर, फारुखाबाद, कन्नौज, कुशीनगर येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
फिरोजाबाद, आग्रा, मथुरा, मैनपुरी, इटावा आसपासच्या भागातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.