दिल्ली : आता जानेवारी महिना संपायला अवघे चार दिवस उरले असले तरी कडाक्याची थंडी कमी होण्याचे नाव घेत नाही. देशातील लोक जानेवारी महिन्यात अशा भीषण थंडीचा अनुभव घेत आहेत. केवळ उत्तर भारत नाही तर पश्चिम आणि दक्षिणेतील राज्यातही या महिन्यात कडाक्याचा हिवाळा जाणवत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून बर्फाळ वारे वाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सकाळपासून दिल्ली, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये दाट धुके असेल. त्याच वेळी, दिल्ली-एनसीआर भागात आज वातवरणात गारठा कायम राहणार आहे.
दिल्लीत आज कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याआधीच कोल्ड डे अलर्ट जारी केला आहे. किमान तापमान 7 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सकाळी धुके पडल्यानंतर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. दिल्लीच्या हवामानाचा परिणाम एनसीआर आणि इतर आसपासच्या भागातही दिसून येतो. याशिवाय चंदीगडमध्येही किमान तापमानात घट दिसून येते. तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. डेहराडूनमध्ये किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीशिवाय भारतातील इतर राज्यांतही थंडीपासून दिलासा मिळणार नाही. राजस्थानमधील जयपूरमध्ये बुधवारी कमाल तापमान 20 अंशांच्या आसपास आणि किमान तापमान 7 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. थंडीमुळे येथील परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये संध्याकाळी धुके पडू शकते. येथील तापमान आठ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यामुळे सायंकाळी अचानक थंडी पडेल. पाटण्यात थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. येथील किमान तापमान 13 अंशांच्या आसपास राहू शकते. मात्र, धुके पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू, लेह आणि श्रीनगरमध्ये प्रचंड थंडी राहणार आहे. येथे पारा उणेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जारी केलेल्या अंदाजानुसार, श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे शून्य अंश, लेहमध्ये उणे 14 अंश आणि जम्मूमध्ये 5 अंशांपर्यंत असू शकते. यावरून डोंगराळ भागात थंडीचा कडाका वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, उत्तर भारतातील या थंडीचा परिणाम पश्चिम आणि दक्षिणेतील राज्यातही दिसून येत आहे. या राज्यातही कधी नव्हे इतकी थंडी पडली आहे. येथेही आणखी काही दिवस हिवाळा जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राला भरली हुडहुडी..! पुढील दोन दिवसांत कशी असेल परिस्थिती, हवामान विभाग काय म्हणतेय…?