Weather Alert । सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. राज्याच्या काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे तर अनेक भागात अजूनही पावसाने दडी मारली आहे. दरम्यान, यंदा पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अशातच आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.आजपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाकडून सातारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसू शकतो. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे आज विदर्भात पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा फटका बसू शकतो. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने आज विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून अधूनमधून ४०-५० किमी ताशी वेगाने वारे वाहतील.