Water Supply : नगर जिल्ह्यासह राज्यात यंदा जोरदार पाऊस पडल्याने पाण्याची काळजी मिटली आहे. तरी देखील काही ठिकाणी पाण्याची टंचाई होती. त्यामुळे येथील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) केला जात होता. यामध्ये नगर जिल्ह्याचा (Ahmednagar District) समावेश होता. राज्यात सर्वत्र टँकर बंद झाले असतानाही नगरमध्ये टँकर सुरूच होते. अखेर सर्वात उशीरा का होईना पण जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जिल्ह्यात 19 सप्टेंबरपासून एकही टँकर सुरू नाही. बाकीच्या जिल्ह्यात मात्र याआधीच टँकर बंद झाले आहेत.
यंदा देशभरात कडाक्याचा उन्हाळा होता. तसाच पावसाळ्यात पाऊसही (Rain) जोरदार बरसला. इतका की या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके (Crop) भुईसपाट केली. हजारो घरांचे नुकसान केले. पाळीव प्राण्यांनाही फटका बसला. तरी देखील पाऊस थांबला नाही. अगदी ऑक्टोबर उजाडला तरी पाऊस सुरुच आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असला तरी काही ठिकाणी मात्र पाणी टंचाई होती. त्यामुळे येथील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water) केला जात होता. पावसाचे प्रमाण वाढत गेले तसे टँकरचे प्रमाण कमी होत गेले. मात्र टँकर पूर्णतः बंद होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडला.
राज्यातील अन्य जिल्ह्यातील टँकर 5 सप्टेंबरपर्यंत बंद झाले होते. 5 सप्टेंबर या आठवड्यात नगर जिल्ह्याव्यतिरिक्त फक्त सांगली जिल्ह्यात फक्त १ टँकर सुरू होता. त्यानंतर तो ही बंद झाला. नगर जिल्ह्यात मात्र टँकर सुरुच होते. नगर जिल्ह्यात २९ ऑगस्ट या आठवड्यात ६ टँकरद्वारे 9 गावे व 19 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर पुढील 5 सप्टेंबर या आठवड्यात टँकरची संख्या 4 होती. पुढील 12 सप्टेंबर या आठवड्यात फक्त 1 टँकर सुरू होता. पुढील 19 सप्टेंबर या आठवड्यात मात्र हा टँकर बंद झाला, अशा पद्धतीने जिल्ह्यातील टँकरची संख्या शून्यावर आली.
दरम्यान, राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असला तरी काही ठिकाणी पर्जनमान्य सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार पाणी टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रत्येक जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला आहे. तसेच पाण्याची पातळी सरासरीपेक्षा २ मीटरने कमी झाली आहे, अशा तालुक्यातील गावांची यादी तातडीने सादर करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत.