नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे लष्करी संघर्षाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की रशिया केव्हाही युक्रेनवर आक्रमण करू शकतो. अमेरिका आणि युरोपिय देशांना या धोक्याची जाणीव असल्याने ते रोजच रशियाला नवनवीन धमक्या देत असतात. या संकटात अमेरिका अडकला असताना अमेरिकेने चीनला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
या संधीचा फायदा घेऊन तैवानमधील हस्तक्षेपात वाढ करू नये, असा इशारा अमेरिकेने चीनला दिला आहे. अमेरिकेने आधीच चीनला वेढा घातला आहे. तैवानबाबत चीनचे हेतू चांगले नाहीत. अमेरिका आणि इतर देश त्याला सतत इशारे देत असताना, ड्रॅगनही मागे हटायला तयार नाही. अमेरिकेने दोन अण्वस्त्रधारी युद्धनौका तैनात केल्या आहेत, एक फिलिपिन्सच्या समुद्रात आणि दुसरी जपानच्या योकोसुकामध्ये. याद्वारे त्यांनी चीनला तैवानपासून दूर राहावे, असा कडक संदेश दिला आहे.
दुसरीकडे, चीननेही आपली पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) तैनात करून अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. PLA ने रविवारी 39 लढाऊ विमाने तैवानच्या साउथवेस्ट एअर डिफेन्स क्षेत्रात (ADIZ) मध्ये पाठवली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर J-10 आणि J-16 सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे.
दरम्यान, तैवानच्या हवाई दलाने पीएलएला कोणत्याही आक्रमणापासून परावृत्त करण्यासाठी हवाई गस्त आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा अॅक्टिव्ह केली आहे. ऑक्टोबर 2021 नंतर प्रथमच, PLA ने अमेरिकेच्या सरावांच्या तुलनेत इतक्या मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तैवानच्या हवाई हद्दीत चीनकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असल्याने अमेरिकन नौदलाने तैवानच्या मदतीसाठी आपल्या तीन लढाऊ युद्धनौका पाठवल्या आहेत. अमेरिकन जहाजे तैवान आणि जपानजवळ गस्त घालत आहेत.