War News : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Russia Ukraine War) अद्याप शांत झाले नाही की, त्याच दरम्यान आणखी दोन देशांमधील सीमेपलीकडील युद्ध सुरू झाले आणि त्यात सुमारे शंभर सैनिकांचा मृत्यू झाला. आर्मेनिया (Armenia) आणि अझरबैजानच्या (Azerbaijan) सीमेवर सुरू असलेल्या लढाईत दोन्ही बाजूंचे सुमारे 100 सैनिक मरण पावले. त्यामुळे दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासूनचे वैर अधिक गडद होण्याची शक्यता बळावली आहे.
वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी मंगळवारी सांगितले की, अझरबैजानने रात्री उशिरा केलेल्या हल्ल्यात 49 आर्मेनियन सैनिक मारले गेले. अझरबैजानने म्हटले आहे की त्यांचे 50 सैनिक मारले गेले आहेत. अशा प्रकारे दोन्ही देशांत मिळून सुमारे शंभर सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
अहवालानुसार, रशियाच्या (Russia) मध्यस्थीने दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम झाला आणि युद्धविराम करारानुसार सुमारे 2,000 रशियन सैनिक शांतता रक्षक म्हणून या भागात तैनात आहेत. रशियाने दोन माजी सोव्हिएत देशांना मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे आवाहन केले. आर्मेनियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अझरबैजानच्या सैन्याने तोफखाना आणि ड्रोनने हल्ले केले. युद्धविरामासाठी रशियाच्या जलद मध्यस्थीचा प्रयत्न असूनही दिवसभर लढाई (War) सुरूच असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
त्यात असेही म्हटले आहे की गोळीबार कमी झाला आहे परंतु अझरबैजानी सैन्य अजूनही आर्मेनियन प्रदेशात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की आर्मेनियन सैन्याने देशाच्या तीन जिल्ह्यांमध्ये सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार केला आणि आर्मेनियन हल्लेखोरांनी या भागात भूसुरुंग टाकल्या. ते म्हणाले की अझरबैजानच्या सैन्याला जीवितहानी झाली आणि जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
दुसरीकडे अझरबैजानचे म्हणणे आहे की सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी सकाळी आर्मेनियाने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केले. दरम्यान, लष्करी संघर्षाने कोणतीही समस्या सुटू शकत नाही, असे सांगत भारताने (India) मंगळवारी दोन्ही देशांना आक्रमकता आणि युद्धविराम तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, द्विपक्षीय वाद मुत्सद्दीपणाने आणि संवादाने सोडवले जावेत, असा भारताचा विश्वास आहे.
अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात नागोर्नो-काराबाख संघर्ष अनेक दशकांपासून सुरू आहे. नागोर्नो-काराबाख हा अझरबैजानचा भाग आहे परंतु 1994 मध्ये फुटीरतावादी युद्ध संपल्यापासून ते आर्मेनियाच्या समर्थनाखालील सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. 2020 मध्ये, दोघांमधील सहा आठवड्यांच्या युद्धात 6600 हून अधिक लोक मरण पावले.