मुंबई : टेलिकॉम कंपन्यांमध्ये आता एक महिना वैधता असलेले प्लान आणण्यात स्पर्धा सुरू झाली आहे. सर्वात आधी रिलायन्स जिओने 28 दिवसांऐवजी पूर्ण महिनाभर वैधता असलेले प्लान लाँच केले. त्यानंतर काहीच दिवसात एअरटेलनेही असे दोन प्लान लाँच केले. त्यानंतर Vodafone Idea ने सुद्धा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 30 दिवसांचे आणि 31 दिवसांचे रिचार्ज प्लान जोडले होते. ज्यांची किंमत अनुक्रमे 327 आणि 337 रुपये आहे. आता मात्र, कंपनीने आणखी दोन नवे प्लान लाँच केले आहेत. या प्लान्सची किंमत 150 रुपयांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्लान्सची वैधता महिनाभरासाठी आहे.
या नव्या प्लानची किंमत 107 आणि 111 रुपये आहेत. महागाईच्या दिवसात हे प्लान फायदेशीर ठरू शकतात. 111 रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता 31 दिवसांची आहे तर 107 रुपयांच्या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. या दोन्ही प्लान्समध्ये डेटा, एसएमएस आणि कॉलच्या बाबतीत इतर फायदे सारखेच आहेत.
111 रुपयांचा प्लान
हा एक डेटा व्हाउचर प्लान आहे. यामध्ये मर्यादीत स्वरुपात डेटा मिळतो. या प्लानमध्ये युजर्सना फक्त 200 MB डेटा मिळेल. प्लानची वैधता 31 दिवसांची आहे. ज्यांना जास्त प्रमाणात डेटा हवा असतो त्यांच्यासाठी हा प्लान नाही. तसेच या प्लानमध्ये टॉकटाइम आणि व्हाइस कॉलसाठी 1 पैसा प्रति सेकंद शुल्क आकारले जाईल. या प्लानमध्ये एसएमएस फायदे सुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे हा प्लान रिचार्ज करणे फायदेशीर ठरणार नाही.
107 रुपयांचा प्लान
या प्लानमध्ये सुद्धा 200 MB डेटा ऑफर केला जात आहे. 107 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. व्हाइस कॉलसाठी प्रति सेकंद 1 पैसा प्रमाणे शुल्क आकारले जाईल. एसएमएस फायदे मिळणार नाहीत. या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. कंपनीच्या वेबसाइटवर हे दोन्ही प्लान दिसत आहेत. या व्यतिरिक्त कंपनीकडे आणखी एक डेटा व्हाउचर प्लान आहे, ज्याची किंमत 99 रुपये आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम सुद्धा मिळतो.