मुंबई : आर्थिक संकटात अडकलेल्या व्होडाफोन-आयडिया या दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. संकटाच्या काळात ग्राहक कंपनीपासून दूर जात आहेत. आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने तब्बल 19 लाख ग्राहक गमावले आहेत. ग्राहकांच्या बाबतीत कंपनीला गेल्या 5 महिन्यांतील हा सर्वात मोठा धक्का आहे. या 19 लाखांपैकी सुमारे 12 लाख ग्राहक ग्रामीण भागातील होते ज्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनी सोडली. याचे मुख्य कारण खराब नेटवर्क सिग्नल असल्याचे मानले जात आहे.
अहवालानुसार, कंपनीच्या ग्राहकांमध्ये सलग 36 व्या महिन्यात घट झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या या कंपनीने गेल्या वर्षभरात फक्त 14 लाख नवीन 4G ग्राहक जोडले आहेत. या काळात एअरटेलने तब्बल 3.4 कोटी तर जोडले आणि जिओने 2 कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत.
कंपनीच्या शेअरची कामगिरी सुद्धा अस्थिर झाली आहे. गेल्या एका आठवड्यात शेअर 13 टक्क्यांहून अधिक तुटला आहे. त्याच वेळी, स्टॉकने एका महिन्यात -21 टक्के, 3 महिन्यांत 22 टक्के, एका वर्षात 7 टक्के आणि 3 वर्षांत -50 टक्के परतावा दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की व्होडाफोन आयडियाने स्टॉक एक्सचेंज बीएसई आणि एनएसईला सांगितले, की बोर्डाच्या बैठकीत स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते आणि एजीआरची संपूर्ण रक्कम व्याजासह भरण्यासाठी नवीन योजनेवर सहमती दर्शविली गेली आहे.
कंपनी ही थकबाकी सरकारला स्टेकद्वारे देईल, म्हणजेच व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची 35.86 टक्के हिस्सेदारी असेल. नोव्हेंबर महिन्यात टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये थोडीशी सुधारणा दिसून आली. एअरटेलने सुमारे 13 लाख आणि जिओने 20 लाख नवीन जोडले. असे मानले जाते की यापैकी बहुतेक ग्राहक हे व्होडाफोन-आयडीयाचे होते. मात्र, ट्राय जेव्हा डिसेंबरची ग्राहक संख्या जाहीर करेल, तेव्हाच कळेल की दरवाढीचा कंपन्यांवर काय परिणाम झाला आहे.
कोटक इक्विटी रिसर्चच्या अहवालानुसार, एप्रिल ते ऑगस्ट 2021 दरम्यान, जिओने 42 लाख सदस्य जोडले होते. ऑक्टोबरमध्ये ही संख्या 18 लाख आणि नंतर नोव्हेंबरमध्ये 20 लाख होती. एका अहवालानुसार, देशात सुमारे 118 कोटी लोक मोबाइल वापरतात. सुमारे 76 कोटी लोक ब्रॉडबँड वापरतात. व्होडाफोन आयडियाचे जवळपास 25 कोटी ग्राहक आहेत. 2020 च्या तुलनेत कंपनीच्या वापरकर्त्यांमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी घट झाली आहे. अलीकडे, केंद्र सरकार देखील कंपनीमध्ये 35 टक्क्यांहून अधिक भागधारक बनले आहे.