Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात चाहते आहेत. आजचे युवा क्रिकेटपटू कोहलीला आपला आदर्श मानतात. क्रिकेटमध्ये त्याचा दर्जा किती मोठा आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Games) क्रिकेटचा समावेश करण्याबाबत मुंबईत मतदान होत असताना त्यावेळी विराटवर बरीच चर्चा झाली होती. म्हणजेच विराट कोहलीने ऑलिम्पिकमध्ये (Olympic Games) क्रिकेटचा समावेश करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा विराट हा जगातील तिसरा खेळाडू आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाईल. याशिवाय इतर खेळ ज्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) त्याच्या 141 व्या सत्रात समाविष्ट करण्यासाठी मान्यता दिली आहे त्यात स्क्वॅश, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस आणि फ्लॅग फुटबॉल यांचा समावेश आहे.
इटलीचा ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज आणि LA28 स्पोर्ट्स डायरेक्टर निकोलो कॅम्प्रियानी म्हणाला, ‘मला वाटते की माझा मित्र विराट कोहली आहे. ज्याचे सोशल मीडियावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) 340 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे लेब्रो जेम्स, टॉम ब्रॅडी आणि टायगर वुड्सच्या एकूण फॉलोअर्सपेक्षा जास्त आहे.
128 वर्षांनंतर क्रिकेटची ऑलिम्पिकमध्ये वापसी
लॉस एंजेलिस-28 आयोजन समितीने शिफारस केलेल्या 5 खेळांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मतदान करणाऱ्या 99 IOC सदस्यांपैकी केवळ 2 सदस्यांनी विरोध केला. त्यांना कार्यकारी मंडळाच्या शिफारशीनुसार हात दाखवून मतदान करण्यास सांगण्यात आले. यानंतर आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा इतर खेळांसोबत समावेश करण्याची घोषणा केली. याआधी ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच क्रिकेट खेळले गेले होते जेव्हा इंग्लँडने 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रान्सला हरवून सुवर्णपदक जिंकले होते.