Vidhansabha Election । जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरूच! शिंदे गटामुळं वाढलं अजितदादांचं टेंशन

Vidhansabha Election । मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. येत्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येणारा काळ हा राज्यासाठी महत्त्वाचा असणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. पुण्यात आता महायुतीतही जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. पुण्यात मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे शिवसेनेला यंदा 8 पैकी किमान 3 जागा तरी मिळाव्यात, अशी मोठी मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केली.

विशेष म्हणजे तशी त्यांनी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, हडपसर मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीत अजित पवार गट ही जागा शिंदे गटाला सोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटप झालं नाही. जागा वाटपात हडपसरसह वडगावशेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघावरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन आघाडीत बिघाडी होऊ शकते.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. असे असले तरीही महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत आता कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Leave a Comment