Vidhansabha Election 2024: संगमनेर भूमाफीयांच्‍या ताब्‍यातून मुक्‍त करायचा, विखेंचा अप्रत्यक्षपणे थोरतांवर हल्लाबोल

Vidhansabha Election 2024: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अहमदनगर उत्तरमध्ये देखील आता राजकीय तापमान चांगलंच वाढवताना दिसत आहे.

अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरीमधून विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर थोरात आणि विखेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे महायुतीच्‍या कार्यकर्त्‍याच्‍या मेळाव्‍यात बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

 तालुक्‍यात परिवर्तन करण्‍याची मानसिकता ही मतदारांची झाली आहे. उमेदवार कोण असले याचा फार विचार न करता महायुतीचा आमदार आपल्‍याला करायचा आहे ही खुनगाठ मनाशी बाळगा, डॉ.सुजय विखे यांच्‍या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्‍यांचा असला तरी, याबाबत महायुतीचे नेतेच निर्णय घेतील. तुम्‍ही कार्यकर्त्‍यांनी फक्‍त तालुक्‍यात परिवर्तन करण्‍याची खुनगाठ मनाशी बाळगा यश आपलेच आहे असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी केले.

मराठा आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडीचे नेते बोलायला तयार नाही. आ.बाळासाहेब थोरात सुध्‍दा आरक्षणाच्‍या बाबतीत गप्‍प बसून आहेत. या राज्‍यात चार वेळा मुख्‍यमंत्री पदाची संधी मिळूनही शरद पवार यांनी मराठा समाजाला न्‍याय दिला नाही. मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या तालुक्‍याचे नेते सुध्‍दा मराठा आरक्षणावर चुप्‍पी घेवून बसले आहेत. तालुक्‍यात वाढलेल्‍या लव्‍ह जिहादच्‍या घटनांबाबतही या तालुक्‍याचे पुढारी गंभीर नसल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी आपल्‍या भाषणात केला.  

हा तालुका आपल्‍याला लॅन्‍ड माफीया आणि भूमाफीयांच्‍या ताब्‍यातून मुक्‍त करायचा आहे. यापुर्वी सर्व शासकीय कार्यलये यशोधन कार्यालयातून चालविली जायची. आज महायुती सरकारची ताकद जनतेच्‍या पाठीशी उभी आहे.

 मोठ्या प्रमाणात विकास कामांना निधी उपलब्‍ध करुन दिला असून, शासकीय योजनांचा लाभही जनतेला मिळत आहे. मात्र एकीकडे महायुती सरकारवर टिका करायची आणि दुसरीकडे योजनांसाठी गावोगावी फिरायचे ही दुटप्‍पी भूमिका आता महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांची उघड झाली आहे.

 त्‍यामुळे जनतेच्‍या मनात धुळफेक करणे थांबवा. लोकसभा निवडणूकीत महायुतीच्‍या उमेदवाराला मिळालेली मतं ही परिवर्तनाची नांदी आहे असे सुचक वक्‍तव्‍य त्‍यांनी केले.

लोकसभा निवडणूकीत नकारात्‍मक प्रचार करुन, महाविकास आघाडीला विजय मिळाला असला तरी, ते वातावरण आता राहीले नाही. महायुती सरकारने वीज बिल माफी पासून ते मुख्‍यमंत्री लाडकी बहीण योजना जाहिर करुन, समाज घटकाला मोठा आधार दिला आहे. 

राज्‍यात पुन्‍हा महायुतीचेच सरकार येणार असल्‍याचा विश्‍वास व्‍यक्‍त करुन, या तालुक्‍यात परिवर्तन करायची खुनगाठ मनाशी बाळगा असे आवाहन त्‍यांनी केले.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी तालुक्‍यात निवडणूक कोण लढविणार यापेक्षा महायुतीचा उमेदवार आपल्‍याला निवडून आणायचा आहे. यासाठी तालुक्‍यातील प्रत्‍येक गावात लोकांशी संपर्क करावा लागेल. उमेदवार हा कोणाच्‍याही दबावाला बळी पडणारा नसावा. परिवर्तनाचा संकल्‍प तुम्‍ही केला तरच, महायुतीला यश मिळू शकते. 

सामान्‍य माणसाला आपल्‍याला विश्‍वास द्यावा लागेल. भविष्‍यात तालुक्‍यातील कुठल्‍याही गावात मी आता भेटी द्यायला सुरुवात करणार आहे. पुढा-यांपेक्षा सर्वसामान्‍य जनतेला आमच्‍यापर्यंत पोहोचू द्या.

काही राजकीय निर्णय करताना कार्यकर्त्‍यांनाही मन मोठ ठेवावं लागेल असे सुचित करुन, विखे पाटील परिवाराला घेरण्‍यासाठी अनेकजण आता सज्‍ज झाले आहेत. मात्र या तालुक्‍यातील सर्वसामान्‍य जनतेचे पाठबळ हेच आमच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचे असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले.

Leave a Comment