Vidhan Sabha Election : राज्यात भाजप किती जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार? जाणून घ्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

Vidhan Sabha Election : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा पराभव झाल्यानंतर आता महायुती पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कामाला लागली आहे.

सूत्रांच्या मतानुसार सांगायचे झाले तर महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीतील घटक पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी जागावाटपाबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजपला जास्तीत जास्त जागा मिळू शकतात. कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील सुरुवातीच्या चर्चेनुसार भाजपने सर्वात जास्त जागांवर दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 155 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 60 ते 65 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असून तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळांनी केली ‘इतक्या’ जागांची मागणी

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी 80 ते 90 जागांची मागणी केली होती, तर शिंदे गटाचे रामदास कदम किमान 100 जागांसाठी आग्रह केला होता. जरी याबाबत पक्षांमध्ये अजूनही एकमत झाले नसले तरी नुकतेच छगन भुजबळ यांनी राज्यसभा निवडणुकीत उमेदवार दिला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

तर त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. दरम्यान, लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीकडून महायुतीला दारुण पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment