Vidhan Parishad Election । विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीच्या ९ आणि महाविकास आघाडीच्या ३ उमेदवारांचा समावेश असून विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पाच वर्षांची मुदत पूर्ण होत आली आहे.
आता विधानसभेचे संख्याबळ २८८ वरून २७६ वर आले आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे ४४ उमेदवार निवडून आले असले तरी सदस्यांचे निधन, पक्षांतर, चार सदस्य लोकसभेवर निवडून येणे, यामुळे साडेचार वर्षांपूर्वी ४४ आमदार असणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ ३७ वर आले आहे.
विशेष म्हणजे विधान परिषदेला एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २३ मतांची गरज आहे. त्यादृष्टिकोनातून पाहिले तर एकच जागा लढविणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव या सर्वाधिक सुरक्षित दिसतात. पण हीच सुरक्षिततेची भावना काँग्रेसला दगाफटका बसू शकतो.
खरंतर काँग्रेसकडे प्रत्यक्षात ३७ आमदारांचा आकडा असला तरी यात इगतपुरीचे हिरामण खोसकर, अमरावतीच्या सुलभा खोडके आणि वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दीकी या तीन आमदारांचा वावर जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत असून भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे समर्थक तीन ते चार आमदार आहेत. त्यांची मते महायुतीला मिळाली पाहिजेत.
अशा पद्धतीने काँग्रेसचे संख्याबळ ३० वर येते. यातील किती मते काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यासाठी निश्चित केली जातात, आणि किती मविआच्या अन्य उमेदवारांना देण्याचे निश्चित केली जातात, हे पाहावे लागणार आहे.