लखनऊ : निवडणुकीआधी पक्ष बदलण्याचा ट्रेंड नवीन नाही, मात्र यावेळी पक्ष बदलाबरोबरच राजकीय वाऱ्याची दिशाही क्षणोक्षणी बदलताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष समाजवादी पार्टीत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फोडाफोडीच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. राज्यात असा कोणताही मोठा पक्ष नाही, ज्याच्या मोठ्या नेत्यांनी निवडणुकीआधी पक्षांतर केले नाही. दहा दिवसांपूर्वी राज्य सरकारमधील तीन मंत्री पक्ष बदलून समाजवादी पक्षात दाखल झाले होते आणि वातावरण समाजवादी पक्षाच्या बाजूने तयार होत असल्याचे दिसत होते, पण अवघ्या दहा दिवसांतच भाजपने जोरदार कमबॅक केले आहे.
किंबहुना, या महिन्याच्या सुरुवातीला स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्यानंतर आणखी काही मंत्री आणि आमदारांनी राजीनाने दिले, त्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या होत्या. या राजकारणात समाजवादी पार्टीने आघाडी घेतल्याचे दिसत होते. स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान, धरमसिंह सैनी, विनय शाक्य यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदारांनी पक्षास सोडचिठ्ठी दिली. मात्र, त्यानंतर सतर्क होत भाजपने रणनिती आखली आणि समाजवाजी पार्टीसही जोरदार धक्के दिले.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह इतर भाजप नेते सपामध्ये सामील होताच, भाजपने डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली. स्वामींसह अनेक आमदारांनी पक्ष सोडल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भाजपनेही काही जणांना तातडीने पक्षात प्रवेश दिला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या परिवारातील काही जणांन पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे समाजवादी पक्षाला मोठाच धक्का बसला. मात्र, तरीही स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्ष सोडल्यामुळे जे नुकसान झाले होते ते भरुन निघाले नव्हते. यासाठी भाजपने जोरदार रणनिती तयार केली. थेट काँग्रेसमधील दिग्गज नेते माजी मंत्री आरपीएन सिंह यांनाच पक्षात आणले. आरपीएन सिंह भाजपमध्ये आल्यामुळे आता स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे या राजकारणात भाजप पुन्हा पुढे निघाल्याचे सध्यातरी दिसत आहे.
उत्तराखंडच्या राजकारणात भूकंप..! नाराज नेते भाजपला देणार जोरदार झटका; पहा, कुणी दिलाय राजीनामा..?