UNESCO : कर्नाटक (Karnataka) राज्यातील होयसळ मंदिरांचाही आता युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. होयसळ मंदिरांमध्ये चन्नकेशव मंदिर, होयसलेश्वर मंदिर आणि केशव मंदिर यांचा समावेश होतो. बाराव्या शतकात बांधलेले हे मंदिर जागतिक वारसा यादीत (World Heritage Site) समाविष्ट होणारे भारतातील 42 वे स्मारक आणि कर्नाटकचे चौथे स्मारक आहे. या यादीत सोमनाथपुरा, हळेबीड आणि बेलूर या मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल राज्यातील शांतिनिकेतनचाही या यादीत समावेश करण्यात आला होता. तुम्हालाही या मंदिरांचे सौंदर्य बघायचे असेल तर जाणून घेऊया या मंदिरांचे वैशिष्ट्य काय? ही मंदिरे आणि इथे कसे जायचे..
होयसळ मंदिर होयसळ राजवंशाच्या राज्यात बांधले गेले. होयसळ घराण्याने त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे बांधली. कर्नाटकातील होयसळ मंदिर हे त्याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे. होयसळ मंदिरे इतकी सुंदर आहेत की या मंदिरांच्या बाबतीत असेही म्हटले जाते की येथील दगडांवर कविता लिहीलेली आहे. ही मंदिरे द्रविड आणि नागारा शैलींचे मिश्रण करून तयार केले गेले होते, परंतु द्रविड शैलींची येथे जास्त झलक पाहण्यास मिळते.
होयसळ मंदिरे बेलूर येथे स्थित चन्नकेशव मंदिर. हे मंदिर होयसळ मंदिरांपैकी सर्वात मोठे मंदिर आहे आणि ते भगवान विष्णूला समर्पित आहे. हळेबीडूचे होयसळेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. केशव मंदिर यापेक्षा लहान आहे पण त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. या मंदिरांच्या भिंतींवर विविध देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते झिग-झॅगच्या आकारात बांधलेले आहेत.
होयसळ मंदिरात कसे जायचे
हळेबिडू म्हैसूरुपासून 150 किमी आहे. म्हैसूरुहून इथे पोहोचायला तीन तास लागतात. ट्रेन किंवा फ्लाइटने तुम्ही इथे सहज येऊ शकता. याशिवाय बंगळुरूहूनही तुम्ही इथे सहज येऊ शकता. इथून हळेबीडूला पोहोचायला चार तास लागतात.
आपण आणखी काय पाहू शकता?
या तीन मंदिरांव्यतिरिक्त केदारेश्वर मंदिर, गोरूर धरण, बसदी हल्ली, पुरातत्व संग्रहालय, श्रावणबेळगोळ यांसारख्या इतर अनेक पर्यटन स्थळांनाही तुम्ही भेट देऊ शकता. केदारेश्वर मंदिर हा होयसळ मंदिराचा एक भाग आहे. येथे असलेली नंदीची मूर्ती या मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.