Arun Gawli: तुरुंगातून अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची होणार सुटका! ‘या’ नियमामुळे येणार 16 वर्षांनंतर बाहेर

Arun Gawli : आज मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेत अंडरवर्ल्ड डॉन आणि अरुण गवळी उर्फ डॅडीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर आता अरुण गवळी तब्बल 16 वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे.

 गवळीने 2006 च्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या आधारे शिक्षेतून सूट मागितली होती. गवळी 16 वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गुलाब गवळीची सुटका करण्याचे निर्देश दिले आणि तुरुंग प्रशासनाला या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली. सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सांगितले की, गवळी 2006 च्या सरकारी धोरणाचा लाभ घेण्यास पात्र आहे.

  त्यानुसार अरुण गवळीने 2006 च्या अधिसूचनेनुसार आपली लवकर सुटका करण्याची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. गवळी यांनी आपल्या याचिकेत आपले वय 69 वर्षे असून, सरकारी आदेशानुसार तुरुंगातून सुटका करावी, असा युक्तिवाद केला होता.

न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने अरुण गवळीची ही याचिका स्वीकारली आहे. गवळीच्या सुटकेबाबत चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. मे महिन्यापर्यंत गवळी तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

मायानगरी मुंबईतील दगडी चाळ येथील अरुण गवळी यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. 69 वर्षीय गवळी 2004-2009 दरम्यान आमदारही होते. 2006 मध्ये मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. 2012 मध्ये शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला?

10 जानेवारी 2006 च्या अधिसूचनेनुसार ज्या कैद्यांची वयाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत, जे शारीरिकदृष्ट्या अक्षम आहेत आणि ज्यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे, अशा कैद्यांना उर्वरित शिक्षेतून सूट देऊन मुक्त करण्याची तरतूद आहे.

Leave a Comment