RBI : केंद्रीय रिजव्र्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने 5 ऑगस्ट 2022 रोजी द्विमासिक पतधोरण आढाव्यानंतर पॉलिसी व्याजदरात (Interest Rate) 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. यानंतर रेपो रेट (Repo Rate) 4.9% वरून 5.4% झाला आहे. रिजव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी आपल्या घोषणेत सांगितले की, आपण चलनवाढीच्या समस्येतून जात आहोत आणि आर्थिक बाजारपेठही अस्थिर झाली आहे. जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती लक्षात घेऊन चलनविषयक धोरण समितीने बेंचमार्क दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या वाढीनंतर रेपो दर कोरोनापूर्व पातळीवर पोहोचला आहे. ही सलग तिसरी दरवाढ आहे. याआधी, आरबीआयने मे आणि जूनमध्ये एकूण 0.90 टक्क्यांनी वाढ केली होती. म्हणजेच रेपो दर गेल्या चार महिन्यांत 1.4% ने वाढला आहे. महागाई दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात 25 ते 50 बेसिस पॉईंट्सने वाढ करू शकते, असे सांगितले जात होते. चलनवाढ रोखण्यासाठी आर्थिक धोरण समितीने मवाळ धोरण मागे घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गव्हर्नर म्हणाले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्थिक वाढीचा अंदाज कमी करून मंदीचा धोका व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
शक्तीकांत दास म्हणाले की, रिजर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज 7.2 टक्के ठेवला आहे. केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर (Inflation Rate) 6.7 टक्के राहण्याचा अंदाज कायम ठेवला आहे. ते म्हणाले की, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 6.7 टक्के राखून ठेवला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढ असमाधानकारक पातळीवर आहे. महागाई 6 टक्क्यांच्या वर राहील, असा समितीचा अंदाज आहे.
रिजर्व्ह बँक रुपयाच्या अस्थिरतेवर लक्ष ठेवून आहे. दास म्हणाले की, रुपयाच्या घसरणीचे प्रमुख कारण देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणामुळे नव्हे तर डॉलरचे (Dollar) मजबूत होणे हे आहे. मात्र, आरबीआयच्या धोरणांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया इतर अनेक चलनांच्या तुलनेत अधिक चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले.