अहमदनगर – सकाळचा नाश्ता चविष्ट आणि आरोग्यदायी असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: सकाळचा नाश्ता मुलांना आवडेल आणि त्यांच्यासाठी आरोग्यदायीही असेल असा असावा. पनीर टिक्का रोल या दोन्ही गोष्टी पूर्ण करत असल्याचे दिसते. प्रथिनांनी युक्त पनीर टिक्का रोल खाण्यास जितका स्वादिष्ट आहे तितकाच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ते बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला जातो. तुम्हालाही नियमित नाश्ता करण्याचा कंटाळा आला असेल आणि आता त्यात काही बदल करायचे असतील तर तुम्ही पनीर टिक्का रोल बनवू शकता. ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि काही मिनिटात तयार होते.
पनीर टिक्कासाठी साहित्य – पनीर 100 ग्रॅम, दही 3 चमचे, कांदा 1, सिमला मिरची 1/2, टोमॅटो 1, जिरे पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, चाट मसाला 1/2 चमचा, काळी मिरी पावडर 1/2 चमचा, तेल 1 चमचा, मीठ चवीनुसार.
रोल तयार करण्यासाठी
गव्हाचे पीठ 1 कप, तूप 3 चमचे, टोमॅटो सॉस 2 चमचे, मीठ चवीनुसार.
रेसिपी
पनीर टिक्का रोल बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात पनीरचे छोटे तुकडे घ्या. आता त्यात लाल तिखट, धने पावडर, हळद, काळी मिरी पावडर टाकून पनीर बरोबर मिसळून घ्या. यानंतर भाजलेले जिरे, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. आता पनीरमध्ये दही टाका आणि चांगले मिसळा आणि 10 मिनिटे बाजूला ठेवा.
आता एक छोटी वाटी घ्या आणि त्यात पीठ टाका. 1 चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घाला, थोडे थोडे पाणी टाका आणि पीठ चांगले मळून घ्या. यानंतर काही वेळ पीठ झाकून बाजूला ठेवा. या दरम्यान टोमॅटो, सिमला मिरची आणि कांदा लांब व पातळ कट करुन घ्या. आता कढईत तेल टाकून ते मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात पनीर टाकून 2 मिनिटे शिजू द्या. त्यात बारीक केलेला कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो टाका. हे मिश्रण 1 मिनिट शिजल्यानंतर गॅस बंद करा.
आता पीठ घेऊन अजून एकदा मळून घ्या. त्यानंतर त्याचे गोळे बनवा. आता पीठ घेऊन मोठ्या रोटीप्रमाणे लाटून घ्या. दोन्ही बाजूंनी तूप लावून तव्यावर पराठ्याप्रमाणे भाजून घ्या. यानंतर या पराठ्याच्या वरच्या बाजूला टोमॅटो सॉस लावा. यानंतर पनीर टिक्काचा तयार मसाला मध्यभागी ठेवून पराठा लाटून घ्या. त्याचप्रमाणे सर्व पीठाचे पराठे करून रोल तयार करा. नाश्त्यासाठी स्वादिष्ट पनीर टिक्का रोल तयार आहे.
असे 11 प्रकारचे पिझ्झा जे जगभर खाल्ले जातात.. जाणून घ्या सहज बनवल्या जाणाऱ्या काही पिझ्झाची रेसिपी
Recipe : सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर रोल.. मुलांसह मोठ्यांनाही आवडेल