दिल्ली : रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अजूनही सुरुच आहे. या युद्धाच्या मुद्द्यावर चीनचे (China) एक अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. चीनने युक्रेन-रशियन युद्धाला नाटोच्या (NATO) विस्तारवादी धोरणांचे परिणाम म्हटले आहे. युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याचा आग्रह धरला नसता आणि नाटोने आपले विस्तारवादी धोरण टाळले असते, तर हे युद्ध झालेच नसते, असे चीनने स्पष्टपणे म्हटले आहे.
चीनचे उप परराष्ट्र मंत्री ले युचेंग यांनी एका सांगितले की, पूर्व युरोपमध्ये (Europe) नाटोने जे काही केले, त्याचा परिणाम युद्धाच्या रूपाने समोर आला आहे. आशिया-पॅसिफिक परिसरामध्ये अमेरिका (America) आता नाटोप्रमाणेच काम करत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, अमेरिका आपल्या विस्तारवादी धोरणात वेगाने वाढ करत आहे. त्याचे परिणाम मात्र धोकादायक असतील, अशी धमकीही चीनने यानिमित्ताने दिली आहे.
शिन्हुआ विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीनचे उप परराष्ट्र मंत्र्यांनी हा आरोप नाटो संघटनेवर केला. ते म्हणाले की, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) चाही वॉर्सा करारासह विलय करायला हवा होता. मात्र हे केले नाही. त्याऐवजी, नाटोचा सतत विस्तार केला गेला. त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळेच आज युक्रेनमध्ये युद्ध पेटले आहे. कारण रशियाला (Russia) आपल्या संरक्षणासाठी काही पावले उचलावी लागली, त्याचा परिणाम आज युद्धाच्या रूपाने जगासमोर आहे.
ते म्हणाले की, नाटो जो 1990 नंतर संपुष्टात यायला हवा होता, तो युरोपमध्ये आणखी भक्कम झाला आहे. त्याची व्याप्ती वाढली. अलीकडच्या काळात, अनेक देश या संघटनेत सहभागी झाले आहेत, त्यापैकी बरेच रशियाच्या अगदी जवळ आहेत. हे देश सोव्हिएत युनियनचा भाग होते. युक्रेनने नाटोमध्ये सामील व्हावे असाच आग्रह नाटोचा होता. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु जेव्हा रशियाने समजून सांगितले तरीही युक्रेनने ऐकले नाही त्यानंतर हे युद्ध सुरू झाले.
दरम्यान, दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिका आणि चीन यांच्यात अनेकदा तणाव निर्माण होतो. इतकेच नाही तर तैवानच्या (Taiwan) संदर्भात दोन्ही देश आमनेसामने येत आहेत. तसेच जपान-चीनच्या वादग्रस्त (Japan China Conflict) बेटांबाबतही अमेरिकेचे धोरण जगजाहीर आहे. हिंद-प्रशांत रणनिती पुढे नेणे हे युरोपमध्ये पूर्वेकडे विस्तार करण्याच्या नाटोच्या धोरणाइतकेच धोकादायक आहे. ही रणनिती अव्याहत चालू ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला.