अहमदनगर : आपल्याकडे दिवसाची सुरुवात चहा आणि नाश्त्याने होते. सकाळची वेळ ही नेहमीच घाई गडबडीची असते. लवकर आवरुन ऑफिसला निघायचे असते. वेळ कमी असतो त्यामुळे नाश्ताही अगदी कमी वेळात तयार होणारा हवा असतो. अशा वेळी आपल्याकडे पोहे नाश्त्यात हमखास दिसतात. तसेच अन्यही काही कमी वेळात तयार होणारे खाद्य पदार्थ तयार केले जातात.
पराठाही बहुतेक घरात नाश्त्यासाठी तयार केला जातो. पराठ्याचेही अनेक प्रकार आहेत आणि तो बऱ्याच विविध पद्धतींनी तयार केला जातो. मात्र, सकाळी इतका वेळ कुणाकडे नसतो, तेव्हा कमी वेळात तयार होणारा पराठा बनवण्याकडे कल असतो. त्यामुळे आज आम्ही सुद्धात तुम्हाला कमी वेळात तयार होणाऱ्या पराठ्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा तुम्ही अत्यंत कमी वेळात अगदी सहज तयार करू शकता.
साहित्य- गव्हाचे पीठ, जिरे पावडर किंवा ओवा, मिरची पावडर, तेल किंवा तूप, चवीनुसार मीठ, कोथिंबीरीची पाने.
रेसिपी
नाश्त्यासाठी हा पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पीठ काढून त्यात मीठ, तूप आणि ओवा टाकून मिसळून घ्या. नंतर सर्व मसाले आणि बारीक केलेली कोथिंबीर घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून घेतल्यानंतर पिठाचे छोटे गोळे करा. आता एक गोळा घ्या आणि तळहाताने गोल करा. आता तूप लावून पराठा त्रिकोणी आकारात लाटून घ्या. तवा मध्यम आचेवर गरम करा. त्यावर पराठा टाकून दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्या. नंतर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. उरलेल्या पीठाचेही अशाच पद्धतीने पराठे तयार करुन घ्या. अशा प्रकारे अगदी कमी वेळात तुम्ही हा पराठा तयार करू शकता. तुम्ही हा पराठा दही, लोणचे, चटणी सोबत सर्व्ह करू शकता.
Recipe : मुलांसाठी तयार करा खास चवदार मिक्स व्हेज पराठा.. ही आहे सोपी रेसिपी