नागपूर : गेल्या काही वर्षात वातावरण बदलाचे परिणाम आपण पाहत आहोत. ते भाेगत आहोत.. कधी दुष्काळ, कधी नको इतका पाऊस, कधी अवकाळीचा कहर.. अशा अनेक संकटांना आपण सामोरे जात आहोत. त्यात सर्वाधिक फटका बसतो, तो बळीराजाला.. जागतिक बॅंकेच्या एका अहवालात काही वर्षांपूर्वी विदर्भ व मध्य भारतातील तापमान गेल्या काही वर्षांत वाढले असून, या भागातील पर्जन्यमानातही लक्षणीय बदल होत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता ‘आयपीसीसी’ अर्थात ‘इंटरगर्व्हमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या सहाव्या मूल्यांकन अहवालाचा दुसरा भाग प्रकाशित झालाय. त्यातही असेच काहीसे धक्कादायक निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत.
याबाबत प्रसिद्ध वातावरणतज्ज्ञ डॉ. अंजल प्रकाश यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की ‘वातावरणीय बदलांचा परिणाम आता जगभर जाणवत आहे. त्यात राज्यात मुंबई व समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशांनाही पूरसदृश परिस्थितीत वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य भारताचाही उल्लेख करण्यात आला आहे. विदर्भातील उन्हाळा मुळातच तुलनेने अधिक तीव्र असतो. त्यात ‘वेट बल्ब टेंपरेचर’ही वाढू लागले आहे. त्यामुळे भविष्यात विदर्भ आणि मध्य भारतातील उन्हाळे अधिक तीव्र होणार असून, ते अधिक लांबण्याचीही शक्यता आहे. स्वाभाविकच दुष्काळांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. या सगळ्या बाबींचा परिणाम शेती आणि अर्थव्यवस्थेवर होण्याचा धोका असल्याचे डॉ. प्रकाश यांनी स्पष्ट केले..
‘वेट बल्ब टेंपरेचर’ म्हणजे..
‘वेट बल्ब टेंपरेचर’ म्हणजे उष्णता व आर्द्रता एकत्र करून मोजलेले तापमान.. पाण्यात भिजविलेल्या कपड्याने तापमापी (थर्मामीटर) झाकले जाते. त्यावरून हवा सोडली जाते. सापेक्ष आर्द्रता 100 टक्के असताना, ‘वेट बल्ब टेंपरेचर’ हे हवेच्या तापमानाच्या बरोबरीचे असते. कमी आर्द्रतेवर बाष्पीभवनामुळे ‘वेट बल्ब टेंपरेचर’ कमी असते. बहुतांश देशात हे तापमान 25 ते 30 च्या आसपास असते. हे 31 च्या आसपास गेल्यास मानवी आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते. यात उष्माघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसेच सलग सहा ते सात तासांकरिता 35 अंश तापमान असणे, हेसुद्धा मानवी आरोग्यासाठी घातक आहे. विदर्भ आणि मध्य भारतात पुढील काळात हे धोके वाढण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे.
Poultry Farming Info: म्हणून पोल्ट्रीमध्ये आहे मोठा स्कोप; वाचा महत्वाची माहिती
शेअर बाजारात विक्रीचा धडाका, गुंतवणुकदारांना झटक्यात 1 लाख कोटींचा चूना..