दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि निवडणूक असलेल्या उत्तर प्रदेश या राज्यात कोरोना अजूनही काळजीत टाकणारा मुद्दा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज सांगितले की, केंद्रीय आरोग्य पथके या राज्यांमध्ये पाठवण्यात आली असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
महाराष्ट्रात पॉजिटिविटी दर 22 टक्के नोंदला गेला आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये पॉजिटिविटी दर अनुक्रमे 20 टक्के आणि 32 टक्क्यांपर्यंत होते. दिल्लीमध्ये 30 टक्के पॉजिटिविटी दर नोंदवला गेला आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये 6 टक्क्यांहून अधिक पॉजिटिविटी दर नोंदवला गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की “सध्या जग कोविडची चौथी लाट पाहत आहे, गेल्या 1 आठवड्यात दररोज 29 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. आफ्रिकेत गेल्या 4 आठवड्यामध्ये कोविडची प्रकरणे कमी होत आहेत. आशियामध्ये कोविडची प्रकरणे वाढली आहेत. युरोपमध्येही रुग्ण आता कमी होत आहेत.”
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान ही दैनंदिन प्रकरणे सर्वाधिक असणारी राज्ये आहेत. 19 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील 515 जिल्हे असे आहेत जिथे साप्ताहिक संसर्ग दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, की 30 एप्रिल 2021 रोजी जेव्हा दुसरी लाट शिखरावर होती, तेव्हा 3,86,452 नवीन प्रकरणे, 3,059 मृत्यू आणि 31,70,228 अॅक्टिव्ह रुग्ण होते. पूर्ण लसीकरण झालेल्यांचे प्रमाण फक्त 2 टक्के होते. तर 20 जानेवारी 2022 रोजी 3,17,532 नवीन प्रकरणे, 380 मृत्यू आणि 19,24,051 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांचे प्रमाण 72 टक्के आहे.
दरम्यान, देशभरात मागील 24 तासात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. या रुग्णसंख्येने मागील 8 महिन्यांचे रेकॉर्ड मोडले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत तेथेही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.