नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोना संसर्गाची प्रकरणे अतिशय वेगाने वाढत आहेत. येथे एका दिवसात तब्बल 13.5 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. कोणत्याही देशात एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येण्याची ही सर्वात मोठी घटना आहे. याआधी अमेरिकेतच या वर्षी ३ जानेवारीला 1 लाख 30 हजार प्रकरणे नोंदवली गेली होती.
अमेरिकन वैद्यकीय संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 जानेवारी रोजी 1,36,604 लोकांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एकाच दिवसात सर्वाधिक 1,32,051 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमेरिकेत दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्या आहेत. जागतिक महासत्ता असलेला हा देश सध्या कोरोनाने प्रचंड हैराण झाला आहे.
दुसरीकडे, कोरोनाच्या उद्रेकामुळे चीनने आता आणखी एका शहरात लॉकडाऊन केले आहे. सध्या चीनमधील तीन शहरांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशातील सुमारे दोन कोटी लोकसंख्येस घरात कैद करण्यात आले आहे. अन्य देशांच्या तुलनेत चीनमधील लॉकडाऊन अत्यंत कठोर असतात. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनयांग शहरात लॉकडाऊन किती काळ लागू राहील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या शहराची लोकसंख्या 55 लाख आहे. याशिवाय, शियानमधील 1.3 कोटी लोक आणि अन्य एका शहरातील 11 लाख लोक लॉकडाऊन निर्बंधात राहतील.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी मंगळवारी सांगितले की, वृद्धांना कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लसीचे ‘बूस्टर’ डोस देण्याच्या मोहिमेस गती देण्यासाठी आणि कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशाच्या सीमा फेब्रुवारीमध्ये बंद राहतील. जपानमध्ये, डिसेंबरमध्ये संसर्गाची प्रकरणे फारच कमी प्रकरणे होती, परंतु नवीन पॅटर्न दिसल्यानंतर, प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली. किशिदा यांनी गेल्या आठवड्यात ओकिनावा, हिरोशिमा या प्रांतांमध्ये प्री-इमर्जन्सी स्टेट घोषित केले.