अहमदनगर : मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा हा सण 14 जानेवारीला साजरा होणार आहे. मकर संक्रांतीला खिचडीचे वेगळेच महत्व आहे. या सणाच्या दिवशी घरात खिचडी असतेच. अशा परिस्थितीत, जर तुम्ही यावर्षी खिचडी बनवण्याची नवीन रेसिपी शोधत असाल, तर जाणून घेऊया हेल्दी मूग डाळ खिचडी कशी तयार करतात. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खिचडीही अगदी कमी वेळात तयार होते.
साहित्य – 1 कप मूग डाळ, एक कप तांदूळ, अर्धा कप चिरलेली बीन्स, एक लहान बटाटा, 1 कप फुलकोबी, अर्धा कप गाजर, एक लहान टोमॅटो, एक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा अद्रक पेस्ट, 1/4 चमचा गरम मसाला, 2 सुक्या लाल मिरच्या, एक चमचा खडा मसाला, 3 चमचे तूप, 1/4 चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहरी.
रेसिपी
मूग डाळ मसाला खिचडी तयार करण्यासाठी प्रथम मूग डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ करा. आता कुकरमध्ये तूप टाका आणि गरम केल्यावर खडा मसाल्यासह भाज्या टाकून तळून घ्या. यानंतर कुकरमध्ये तांदूळ, मूग डाळ आणि पाणी टाकून कुकरचे झाकण बंद करा. यानंतर एका कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि हिंग टाका. नंतर त्यात टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, मीठ, लाल तिखट आणि अद्रक पेस्ट, गरम मसाला टाकून आणखी काही वेळ शिजू द्या.
नंतर त्यात तयार खिचडी टाका आणि सुमारे 10 मिनिटे शिजू द्या. कढईत तूप, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी करा. खिचडी गॅसवरून काढून टाकल्यावर त्यामध्ये ही फोडणी टाका. त्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकून ही खिचडी दही, पापड, तूप आणि लोणच्याबरोबर सर्व्ह करा.
मकर संक्रांत स्पेशल : शेंगदाणे नव्हे तर सुक्या मेव्याने बनवा अशी आरोग्यदायी चिक्की