मुंबई : देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलर विक्री 2021 मध्ये वर्षभराच्या आधारावर 132 टक्क्यांनी वाढली आहे. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (SMEV) ने ही माहिती दिली आहे. हाय-स्पीड आणि लो-स्पीडसह इलेक्ट्रिक दुचाकींची एकूण विक्री 2,33,971 पर्यंत वाढली आहे. तर 2020 मध्ये 1,00,736 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या होत्या.
आकर्षक किमती, कमी खर्च आणि कमी देखभाल यामुळे ग्राहक आता मोठ्या प्रमाणात पेट्रोलवरून इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळू लागले आहेत, अशी माहिती उद्योग संस्थेने दिली. SMEV ने सांगितले की, हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी, ज्यांचा वेग 25 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे, त्यांच्या विक्रीत 425 टक्के वाढ झाली आहे.
त्याच वेळी, लो-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीत केवळ 24 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2021 च्या शेवटच्या दोन तिमाहीत कमी-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकींनी नकारात्मक वाढ दर्शवली असल्याचे उद्योग संस्थेने म्हटले आहे. पुढे, कमी-स्पीड विभागाचा बाजार हिस्सा, जो मागील सर्व वर्षांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त होता, ऑक्टोबर-डिसेंबर 2021 च्या शेवटच्या तिमाहीत 15 टक्क्यांपेक्षा कमी झाला.
उल्लेखनीय म्हणजे, कमी गतीच्या इलेक्ट्रिक दुचाकींना केंद्र सरकारच्या ‘FAME 2’ धोरणांतर्गत अनुदान दिले जात नाही. हे अनुदान केवळ बॅटरी क्षमतेवर आधारित हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकींसाठी उपलब्ध आहे. यामुळे एंट्री-लेव्हल हाय-स्पीड दुचाकी अनेक लो-स्पीड दुचाकींपेक्षा स्वस्त झाल्या आहेत.
SMEV चे महासंचालकांनी सांगितले, की गेल्या 15 वर्षांत आम्ही एकत्रितपणे सुमारे 10 लाख इलेक्ट्रिक व्हेइकल, तीनचाकी, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बस विकल्या गेल्या आहेत आणि जानेवारी 2022 पासून वर्षभरात दहा लाख युनिट्सची विक्री होण्याची शक्यता आहे.
हिरो इलेक्ट्रिकला धक्का..! ‘या’ कंपनीच्या स्कूटरची रेकॉर्ड ब्रेक विक्री; पहिला नंबरही मिळवलाय..