मुंबई : देशातील वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरो इलेक्ट्रिकलाही आता जोरदार झटका बसला आहे. गुडगाव येथील ओकिनावा कंपनीने हिरो इलेक्ट्रिकला मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आहे. गेल्या महिन्यात ओकिनावाने सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने विकली. जेएमके रिसर्चच्या अहवालानुसार, ओकिनावाने डिसेंबर 2021 मध्ये एकूण 6098 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या, तर हिरो इलेक्ट्रिकने एकूण 6058 युनिट्स विकल्या. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत फारसा फरक नाही. मात्र, तरीसुद्धा हिरो सारख्या कंपनीस टक्कर देणे हे देखील महत्वाचे आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सात महिन्यांत ओकिनावाने विक्रीमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एप्रिल आणि मे 2021 मध्ये देखील ओकिनावाने हिरो इलेक्ट्रिकला पराभूत केले होते. सध्या, ओकिनावाकडे हाय-स्पीड रेंजमध्ये तीन स्कूटर आहेत रिज, प्रेझ प्रो आणि आय प्रेझ प्लस. साधारण 71 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत या स्कूटरच्या किंमती आहेत.
अहवालानुसार, डिसेंबर 2021 मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत ओकिनावा प्रथम क्रमांकावर आहे आणि हिरो इलेक्ट्रिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. यासह, अॅम्पीयर वाहने आणि एथर एनर्जी डिसेंबर 2021 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
डिसेंबर 2021 मध्ये 24,725 हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या. वार्षिक आधारावर विक्रीत 444 टक्के आणि मासिक आधारावर 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या जगभरात सेमीकंडक्टरची कमतरता आहे. या संकटातून वाहन उद्योग अजूनही बाहेर पडलेला नाही. दुसरीकडे, लिथियम-आयन बॅटरींची वाढती मागणी यामुळे अनेक कंपन्यांना पुरवठ्यात समस्या येत आहेत. हिरो इलेक्ट्रिकने सध्या बुकिंग घेणे बंद केले आहे. एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिकच्या बाबतीतही असेच घडत आहे.