मुंबई : देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. रोज हजारोंच्या संख्येत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे क्रिकेटलाही या संकटाचा फटका बसला आहे. आयपीएलचे भवितव्य संकटात सापडले आहे. तर देशातील सर्वात प्रमुख क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी देखील संकटात सापडली आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रणजी ट्रॉफी स्पर्धा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
ही स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती, मात्र बीसीसीआयने त्याआधीच हा निर्णय घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बोर्डाने स्पर्धा रद्द केली होती. 1934-35 मध्ये भारताची ही प्रथम श्रेणी स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा सलग 85 वर्षे आयोजित करण्यात आली आणि नंतर प्रथमच ती एकाही सामन्याशिवाय रद्द करावी लागली. आता सलग दुसऱ्या वर्षी ती रद्द होण्याचा धोका आहे. मात्र, मंडळाने सध्या ही स्पर्धा काही दिवस पुढे ढकलली आहे.
38 संघांची ही स्पर्धा 13 जानेवारीपासून देशाच्या विविध भागात सुरू होणार होती. मुंबई, ठाणे, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथे प्रथम गट टप्प्यातील सामने होणार होते. बीसीसीआयने 4 जानेवारी रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता रणजी करंडक, कर्नल सीके नायडू ट्रॉफी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त सीके नायडू ट्रॉफी देखील या महिन्यात सुरू होणार होती. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की ते खेळाडू आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेशी तडजोड करू इच्छित नाहीत आणि म्हणूनच स्पर्धा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती पाहता पुढील निर्णय घेणार असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.
IPL 2022 : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर.. ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता..