कोरोना अपडेट : ओमिक्रॉनमुळे रुग्णवाढ सुस्साट, तरीही निर्बंधांचा विचार नाही; पहा, ‘या’ देशात चाललेय तरी काय..?
नवी दिल्ली : जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे दहशत निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अनेक देशांनी लसीचे बूस्टर डोस देणे सुरू केले आहेत. फ्रान्समध्येही ओमिक्रॉनचे संक्रमण वेगाने वाढत चालले आहे. देशाचे आरोग्यमंत्री ऑलिव्हियर वेरान यांनी सांगितले की, देशात वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात एक लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. असे असूनही, देशात कोणत्याही नवीन निर्बंधांचा विचार सरकारने केलेला नाही.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ओमिक्रॉन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीच्या बूस्टर डोसवर विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाचा हा प्रकार अतिशय संसर्गजन्य आहे. त्यामुळे देशातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही बूस्टर डोस देण्यावर भर दिला असून भविष्यात याचा वेगात आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री वेरान यांनी सांगितले.
फ्रान्समध्ये, एका दिवसात सुमारे 70 हजार कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. सध्या देश कोरोनाच्या पाचव्या लाटेचा सामना करत आहे. ओमिक्रॉन प्रकार हे जानेवारीच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये संसर्गाचे प्रमुख कारण असण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
दरम्यान, जगातील अनेक देश ओमिक्रॉनच्या विळख्यात अडकले आहेत. चीनमध्ये काही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. भारतात काही राज्यात रुग्ण वाढत आहेत. युरोपीय आणि आफ्रिकी देशात तर परिस्थिती आधिक खराब झाली आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिला आहे. तसेच लसीकरणावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ओमिक्रॉनचा धसका..! ‘या’ देशांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध; इस्त्रायलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय