होऊ दे खर्च..! कोरोना काळातही लोकांची जोरदार खरेदी सुरू; जाणून घ्या, काय आहे खरे कारण
मुंबई : कोरोना काळात देशात काही प्रमाणात मंदी होती. या काळात लोकांसमोर आर्थिक अडचणी असल्याने खरेदी घटली होती. आता मात्र कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. रोजगारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांनी पुन्ही जोरात खरेदी सुरू केली आहे. कुणी कार खरेदी करत आहे तर कुणी नवीन घर घेत आहे.
विशेष म्हणजे, दिवाळीनंतर शक्यतो घर आणि कारसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी होते, असा अनुभव आहे. यंदा मात्र तसे काही घडलेले नाही. बँकांचे व्याजदर मागील दहा वर्षात सर्वात कमी आहेत. ज्याचा फायदा लोकांनी घेतला आहे. नवीन वर्षापासून बँका व्याजदरात वाढ करतील, अशी शक्यता व्यक्त होत असल्याने लोक सध्या कमी व्याजदरातील कर्जाचा फायदाही घेत आहेत.
सार्वजनिक आणि खासगी दोन्ही बँकांचे म्हणणे आहे, की सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही किरकोळ कर्जाची मागणी जास्त आहे. घर, कार आदी खरेदी करण्यासाठी ग्राहक कमी व्याजदराचा पुरेपूर फायदा घेत आहेत.
आरबीआयने दिलेलया माहितीनुसार, 22 ऑक्टोबरपर्यंत थकीत किरकोळ कर्ज 29.55 लाख कोटी रुपये होते, जे एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 11.7 टक्क्यांनी जास्त आहे. बँका ग्राहकांसाठी कर्ज अर्जांमध्ये वाढ दिसत आहेत आणि सर्व किरकोळ विभागामध्ये हा कल कायम राहील असे अपेक्षित आहे. कॉर्पोरेट कर्जाच्या मागणीत वाढ होत नसल्यामुळे बँका सध्या त्यांची वाढ कायम ठेवण्यासाठी किरकोळ कर्जावर पूर्णपणे अवलंबून आहेत. त्यामुळेच बँका सध्या खास ऑफर्स देत आहेत.
सध्या किरकोळ कर्जाच्या मागणीत कोणतीही कमतरता नसून ती आणखी वाढेल, असा विश्वास बँकांना आहे, कारण व्याजदर वाढण्याची भीती लोकांमध्ये आहे. कोरोनाच्या संकटामुळे जवळपास सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले होते. बाजारपेठ पूर्णपणे ठप्प होती. कारण, बहुतांश लोकांचे रोजगार गेले होते. पण सणासुदीच्या काळात परिस्थिती बरीच सुधारली आहे. नवीन वर्षात अनेक बदलही होणार असून, यादरम्यान बँकांकडून लोकांना अनेक आकर्षक ऑफर्सही देण्यात येत आहेत. अहवालानुसार, अन्य वर्षांच्या तुलनेत या महिन्यांत बरीच खरेदी झाली आहे.
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी…! ‘आरबीआय’चे पतधोरण जाहीर, रेपो रेट जाणून घेण्यासाठी वाचा..