… म्हणून शेअर मार्केटला आलेत अच्छे दिन..! केंद्र सरकारनेच दिलेय ‘त्या’ प्रश्नाचे उत्तर; तुम्हीही जाणून घ्या
मुंबई : कोरोनाच्या संकटाने जगभरात अनेक बदल घडवून आणले आहेत. आपण ज्याचा कधीही विचार केला नसेल अशा बाबतीत सुद्धा काही बदल करणे भाग पडले आहेत. कोरोनाने लोकांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांनी आता पैसे खर्च करणे कमी केले आहे. पैसे गुंतवणुकीसाठी नवीन मार्ग शोधले आहे. कमी मुदतीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. तर दुसरीकडे शेअर मार्केटला अच्छे दिन आले आहेत. याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेमध्ये छोट्या बचत योजनांच्या संबंधित आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये विविध छोट्या बचत योजनांतर्गंत वर्षभरात देशात एकूण 4.66 कोटी ग्राहकांनी खाते सुरू केले होते. 2019-20 मध्ये त्यात घट होऊन हेच प्रमाण 4.12 कोटींवर आले तर 2020-21 मध्ये त्यात आणखी घट नोंदवण्यात आली, 2020-21 मध्ये 4.11 कोटी लोकांनी कमी मुदतीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली. तर चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत केवळ 2.33 कोटी लोकांनी खाते उघडले आहे.
दुसरीकडे डिमॅट खात्यांमध्ये मात्र गेल्या साडेतीन वर्षात दुप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. 2018-19 मध्ये देशात एकूण 3.59 कोटी डिमॅट खाती होती. त्यामध्ये वाढ होऊन 2019-20 मध्ये त्याची संख्या 4.06 कोटींवर पोहोचली. मागील वर्षी एकूण 5.51 कोटी डिमॅटची खाती होती. चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत या खात्यांची संख्या 7.38 कोटींवर पोहोचली आहे.
लहान बचत योजनांचे खाते कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मिळणारा परतावा. या योजनांमध्ये परतावा कमी मिळतो. तसेच कोरोना काळात अनेक बँकांनी ठेवींवरील व्याजदर कमी केले आहेत. व्याजदर कमी झाले तर गुंतवणूकदारांचे नुकसान होते. दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये मात्र पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. येथे जोखीम मात्र जास्त असते. येथे कमी काळात परतावा जास्त मिळतो. त्यामुळे शेअर मार्केटकडे कल वाढत असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
शेअर मार्केटचा मोठा नियम बदलणार, शेअर धारकांवर काय परिणाम होणार, वाचा..!