वाव.. मिळालीय खुशखबर..! तर सोन्याचे भाव होतील आणखी कमी; जाणून घ्या, कोणता आहे प्रस्ताव
नवी दिल्ली : जगभरात ओमिक्रॉनचे संकट वाढत असताना गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून सोन्यास मागणी वाढली आहे. परिणामी जागतिक बाजारात सोन्याचे दरात वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत मार्केटमध्ये सुद्धा सोन्याचे दर वाढले आहेत. दुसरीकडे मात्र, एका वेगळ्याच कारणाने सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात ते सगळे सरकारवर अवलंबून राहणार आहे.
सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सादर करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यामध्ये घट करून ते 4 टक्क्यांपर्यंत कमी करावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्यास सोन्याचे दर थेट 3.5 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तसेच सरकारने जर वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून सोन्याच्या आयात शुल्कात घट केली तर सोन्याच्या तस्करीला सुद्धा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सरकारने याआधी सुद्धा सोने चांदीच्या आयात शुल्कात कपात केली होती. आधी या धातूंवर जवळपास 12.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येत होते. त्यानंतर यामध्ये कपात करुन शुल्क 7.5 टक्के इतके करण्यात आले. आता यामध्ये आणखी घट करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाने सरकारला सादर केल्याची माहिती मिळाली आहे. जर हा प्रस्ताव सरकारने स्वीकारला तर सोन्याच्या दरात 3.5 टक्के कपात होऊ शकते. देशात मोठ्या प्रमाणात सोने आयात केली जाते. त्यामुळे सोन्यावर आयात शुल्क जास्त आहे.
गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्याचा फायदा हा सामान्य ग्राहकांना देखील होऊ शकतो.
..म्हणून पुन्हा वाढताहेत सोने-चांदीचे भाव; जाणून घ्या, भाववाढीचे खरे कारण..