बाब्बो.. बँक कर्मचारी संपामुळे तब्बल ‘इतक्या’ कोटींचे व्यवहार रखडले; पहा, संपाचा कसा होतोय इफेक्ट
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणा विरोधात बँकांचे लाखो कर्मचारी संपावर आहेत. यामुळे देशभरातील बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी सुमारे 19 हजार कोटी रुपयांचे व्यवहार होऊ शकले नाहीत. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा जवळपास 9 लाख बँक कर्मचारी संपावर आहेत.
बँक कर्मचाऱ्यांचा हा संप सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आहे. यावेळेस दोन बँकांच्या खासगीकरणाचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणास विरोध करण्याच्या उद्देशाने बँक कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला असून या संपात देशभरातील लाखो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) सरचिटणीस सी एच वेंकटचलम यांनी सांगितले की, गुरुवारी संपामुळे 20 लाखांहून अधिक धनादेशांचे क्लिअरन्स रखडले. त्यामुळे 18,600 कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला. या संपामुळे चेक जमा करणे, रोख रक्कम काढणे, कर्ज काढणे या कामांवर अधिक परिणाम होत आहे.
मात्र, खासगी बँकांचे कर्मचारी संपावर नसल्याने तेथे नेहमीप्रमाणे कामकाज सुरू आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँक या खासगी क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांमध्ये ग्राहकांना कोणतीही अडचण नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नऊ कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. त्यात देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक यांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
तसे पाहिले तर, बहुतेक परिणाम फक्त चेक क्लिअरिंगवर होत आहेत. कारण उर्वरित सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध असल्याने ग्राहकांना फारसा त्रास होत नाही. डिजिटल बँकिंगमध्ये हस्तांतरण, एटीएममधून पैसे काढणे, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग इत्यादींचा समावेश होतो. आतापर्यंत शहरी भागातील एटीएममध्ये रोख रकमेची समस्या नाही. मात्र, दोन दिवसांपासून एटीएममध्ये पैसे जमा न झाल्याने शनिवारी अडचण येऊ शकते.
… म्हणून आजपासून बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलाय संप; जाणून घ्या, काय आहे महत्वाचे कारण