चीनला पुन्हा झटका.. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियानेही घेतलाय ‘तो’ निर्णय; पहा, काय सुरू आहे जागतिक राजकारणात
नवी दिल्ली : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद चीनसाठी जास्तच त्रासदायक ठरत असल्याचे दिसत आहे. तैवान आणि दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्यावर तर दोन्ही देश एकमेकांना थेट धमक्या देत आहेत. आता हा वाद अन्य क्षेत्रांपर्यंत येऊन पोहोचला आहे. या वादात आता अन्य देशांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षातील फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांवर अमेरिकेने राजनैतिक बहिष्कार टाकला आहे. या निर्णयामुळे चीनला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असतानाच आणखी एका देशाने चीनला धक्का दिला आहे.
अमेरिके पाठोपाठ ऑस्ट्रेलियाने सुद्धा या स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पर्धांवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय जर प्रत्यक्षात आला तर चीनच्या डोकेदुखीत आणखी वाढ होणार आहे.
याआधी सोमवारी अमेरिकेने बहिष्काराचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाबाबत माहिती देताना व्हाइट हाऊस सचिव जेन साकी यांनी सांगितले होते, की जर अमेरिकी खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा असेल त्यांना रोखले जाणार नाही. मात्र, या स्पर्धांमधील कोणत्याही समारंभांना अमेरिकी अधिकारी उपस्थित राहणार नाहीत. अनेकदा विचार केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकेनंतर आता ऑस्ट्रेलियाने सुद्धा अशाच प्रकारे कार्यवाही करण्याचा विचार केला आहे. ऑस्ट्रेलियाच नाही तर कॅनडा सुद्धा विचार करत आहे. कॅनडाने अद्याप बहिष्काराचा निर्णय घेतलेला नाही. तसेही काही दिवसांपासून चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही वाद सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानांनीही अनेक वेळा चीनला सुनावले आहे. दुसरीकडे चीनही ऑस्ट्रेलियाची कोंडी करण्याचा प्रयत्न कायम करत असतो. या वादामुळे ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्द्यावर चीनने अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. जागतिक राजकारणात बदलत चाललेल्या या घडामोडींचा कुणाला फायदा होणार आणि कुणाचे नुकसान होणार, हे आताच सांगता येणे कठीण आहे.
अखेर अमेरिकेने ‘तो’ निर्णय घेतलाच; चीनला बसणार मोठा झटका; पहा, दोन्ही देशांचा वाद कुणाला ठरतोय घातक