‘मारुती’ पाठोपाठ ‘टाटा मोटर्स’नी वाढविल्या वाहनांच्या किंमती, किती रुपयांनी होणार वाढ, वाचा..!
मुंबई : काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीनेही ‘मारुती’च्या पावलावर पाऊल ठेवत आपल्या वाहनांच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे.
देशांतर्गत वाहन क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने 1 जानेवारीपासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या (Vehicles) किंमती 2.5 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.. वस्तूंच्या किमतीत आणि कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहनांच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय सर्व श्रेणींना लागू असेल. मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने, मध्यवर्ती आणि हलकी व्यावसायिक वाहने, लहान व्यावसायिक वाहने आणि बसेसच्या किमतीही वाढविण्यात येणार आहेत.
पोलाद, अॅल्युमिनियम आणि इतर मौल्यवान धातूंच्या किमती वाढण्यासह इतर कच्च्या मालाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा मोठा भार कंपनीवर पडत आहे. आता वाहनांच्या किमती वाढवून त्याचा काही भार ग्राहकांवर टाकावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, यापूर्वी मारुती सुझुकी, मर्सिडीज-बेंझ आणि ऑडी कंपन्यांनीही पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता टाटा मोटर्सनेही त्यांचाच कित्ता गिरवला आहे..
‘मारुती’च्या विक्रीत घट
नोव्हेंबरमध्ये मारुती सुझुकीची एकूण 1,39,184 युनिट्सची विक्री झाली. त्याच वेळी, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते 1,53,223 युनिट विक्री झाली होती. जागतिक चिप तुटवड्यामुळे उत्पादनात घट झाल्याने विक्रीतही घट झालीय. नोव्हेंबर 2021 मध्ये मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री 1,13,017 युनिट्स होती. त्याच वेळी, इतर OEM ची विक्री 4,774 युनिट्स असल्याचे सांगण्यात आले..
एलआयसी ‘आयपीओ’ बाबत महत्वाचा अपडेट; पहा, कधीपर्यंत येऊ शकतो आयपीओ..?
बाब्बो… आतापर्यंत ‘इतक्या’ देशांत पोहोचलाय ओमिक्रॉन; WHO ने दिलीय महत्वाची माहिती