मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशसह, ओडिशा आणि महाराष्ट्राच्या काही भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसला. हे संकट घरात असतानाच, महाराष्ट्रासह गुजरातच्या दारावर आणखी एक चक्रीवादळ येऊन थांबले आहे. त्याचा मोठा फटका या दोन्ही राज्यांना बसण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. विदर्भासह अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राज्यात पुढील ४८ तास दिसणार आहे.
शाहिन येतेय..
‘गुलाब’ चक्रीवादळ शमत नाही, तोच महाराष्ट्र नि गुजरातच्या दिशेने ‘शाहीन’ चक्रीवादळ कूच करीत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील काही दिवसांत शाहीन वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पुढील २४ तासांत मुसळधार ते अति मुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. शिवाय नाहीसे होत आलेलं ‘गुलाब’ चक्रीवादळ नव्याने जन्म घेण्याची शक्यताही व्यक्त होतेय. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होत असून, त्याला ‘शाहीन’ असे नाव ओमानने दिलं आहे.
महाराष्ट्र नि गुजरातसाठी पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. ते 30 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रावर पोहोचेल. तिथे त्याचे रुपांतर वादळात होण्याची शक्यता आहे. या वादळाच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात कुठे कोणता अलर्ट?
रेड अलर्ट: पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना.
ऑरेंज अलर्ट: मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदूरबार.
यलो अलर्ट: बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग.
एमपीएससीचा अंतिम निकाल अखेर जाहीर, कुठे पाहता येणार, वाचा
मोदी सरकार त्यासाठी घेणार तब्बल 5 लाख कोटींचे कर्ज; पहा, काय आहे सरकारचा प्लान