आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्य स्मरणाच्या पूर्वसंध्येला “मराठ्यांच्या” राज्यातील मराठा जातीचे आरक्षण रद्द झाले. मोठा कल्लोळ माजला ! आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही. तर समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान मिळवून देण्याचा तो एक प्रयत्न आहे. परंतु त्याच आरक्षणाला गरिबी हटाव कार्यक्रम सारखे राबवले गेले. त्यातून गरिबी हटली नाही, परंतु त्यात गरीब हटले आणि भरडले गेले. मुठभर लोक अतिश्रीमंत झाले. आरक्षणातून देखील त्या त्या समाजातील मुठभर लोकच पुन्हा पुन्हा लाभार्थी बनताना अन् समाजातील परिघाबाहेर असणारे अजुन दूर लोटले जाताना आपण पहातोच आहोत.
लेखक : डॉ. भारत करडक (करडकवाडी, नेवासा, अहमदनगर)
तरीही आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी सार्वत्रिक भावना आहे. याची दोन कारणे आहेत. एका गटाला तोच एक “राजमार्ग” आहे ज्याचा येनकेन प्रकारे वापर करून आपले “भागवले” जावू शकते, असे पक्के माहिती आहे. तर दुसऱ्या गटाला तो मार्ग नसेल तर आपल्याला इतर कुठलाच मार्ग असणार नाही अशी भीती वाटते. वस्तुस्थिती काय आहे? ज्या समाजात आरक्षण नाही, त्यांनी प्रगती केलीच नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना काही अल्पसंख्यांक समाजाची उदाहरणे समोर ठेवली जाऊ शकतात. मारवाडी समाज, पारशी समाज, बोहरी समाज इत्यादी अल्पसंख्यांक समाजाने कुठल्याही आरक्षणाने नाही तर एकजुटीने समाजाचे प्रश्न सोडवून आदर्श उभे केलेले आहेत.
परंतु हे सारे अल्पसंख्यांक समाज आहेत. बहुसंख्यांक मराठा समाजाला ही उदाहरणे जश्यास तसे लागू होऊ शकतील का? हा प्रश्न आहे. या अल्पसंख्यांक समाजातील एकजुटीने समाजाची प्रगती करण्याचा अल्पसा प्रयत्न मराठा समाजातील ठरावीक कुटुंबांनी नक्कीच केला आहे. ज्या मराठा समाजाचे चित्रण चित्रपट, वृत्तपत्र, आदी माध्यमातून “बाहुबली” स्वरूपात दाखवले जाते, तो तथाकथित उच्चभ्रू मराठा समाज हा केवळ चाळीस कुटुंब अन् त्यांची पाहुणे रावळे एवढ्यावरच अडकलेला आहे. त्याचा परीघ विस्तारत नाही. अलीबाबा अन् चाळीस चोर इतपतच प्रगती रोखली गेली आहे.
मराठा समाजाच्या प्रगतीचा विस्तार वाढवायचा असेल तर या बाहुबली मराठा नेत्यांच्या अन् त्यांच्या मर्यादित कुटुंब कबिल्याच्या बाहेर असलेला मराठा समाज एकत्र करावा लागेल. अन्य अल्प संख्यांक समाजाने (मारवाडी, बोहरी, पारशी) ज्या यशस्वी सुत्रांमधून प्रगती केली ती परस्पर आर्थिक सहकार्य, उद्योजकता, सर्वांना सोबत घेवून जाणे अश्या गुणांचा प्रसार करून गरीब मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या सबळ करावे लागेल. केवळ भावनिक दृष्ट्या एकत्र होऊन नव्हे तर Rational अर्थात वास्तविक दृष्ट्या प्रयत्न करणे गरजेचे असेल. आजवर मराठा म्हणून भावनिक दृष्ट्या एकत्र करून काही ठराविक नेत्यांनी लाभ उठवला हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणूनच, केवळ बेभान होऊन चालणार नाही तर वास्तवाचे भान ठेवून योजना आखावी लागेल. अन् ती योजना बेभान होऊन राबवावी लागेल.
न्यायालयाने अन् घटनेने सर्वांना प्रगतीची समान संधी देताना काही मुठभर घटकांना अमर्याद संधी उपलब्ध करून देणे चुकीचे आहे. संधी दुसऱ्यांदा मिळत नसते असे म्हटले जाते, परंतु व्यवस्थाच अशी निर्माण केली गेलीय की मुठभर लोकांनाच पुन्हा पुन्हा संधी मिळाली असे चित्र दिसते आहे. ही अन्यायाची भावना वंचितांना आक्रमक बनवते आहे. ही आक्रमकता सकारात्मक रीतीने योग्य दिशेला घेवून जाणे, हे नेतृत्वाचे यश असेल. त्यासाठी जुन्या नेतृत्वाने आपल्यात बदल करावेत किंवा नवे नेतृत्व निर्माण व्हावे अशी अपेक्षा !
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
- आता टिपू सुलतानच्या ‘त्या’ मशिदीत पूजेची मागणी; हिंदू पक्षाचा मोठा दावा
- कॉंग्रेस खेळणार मोठा डाव; ‘त्या’ निवडणुकीसाठी तयार केला नवीन फॉर्म्युला
- बाबो..! कडक उन्हातही काँग्रेसचा ‘हा’ आमदार फिरतो अनवाणी; जाणून घ्या नेमका कारण
- T20 World Cup: सॅमसनमुळे टीम इंडिया धोक्यात! वर्ल्डकपमध्ये ‘हा’ खेळाडू जाणार जड
- चीनला धक्का: नेपाळसाठी भारताने घेतला ‘तो’ मोठा निर्णय; आता होणार..