Take a fresh look at your lifestyle.

Blog : हेच आहेत की ‘बळीराजा’ची न आपलीही लायकी दाखवण्याचे दिवस..!

गवार वीस रुपये… कलिंगडं शंभरला तीन..! साधारण 20 मार्चची गोष्ट आहे.सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज.ऑफिसमधून बाहेर पाहिलं पाहिलं. समोरच्या सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डुलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो. इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला, ‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकीये. तिथं पे.’ असा सल्ला दिला. ‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’

Advertisement

दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं. तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तिबी संपली. म्हणून म्हणालो.’ तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, ‘वाह रे वाह शहाणा? म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना आसलं तर तो आम्हाला देऊन जाणार.’ ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं.  

Advertisement

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्या गैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

Advertisement

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्चविद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक इंडेव्हर आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. ‘उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या.’ असं म्हणत तो माणूस पुन्हा इंडेव्हर मधे बसला आणि निघून गेला. आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, ‘त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?’ पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, बाप हे माझा.’

Advertisement

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, ‘घरी इंडेव्हर गाडी असून तू हातगाडीवर भाजी इतकं हिंडतोय व्हय?’ गवार तोलत भैय्या म्हणाला, ‘घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. नगर च्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत पुण्यात पण 2 हेत . पण तात्या म्हणत्यात आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्सहे. आत्ताच्या काळात गरीबाबरं लोक जेवढं वाईट वागत्यात तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.’

Advertisement

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी ऑफिसमधून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता.

Advertisement

लेखक : अॅड. धनंजय म्हस्के पाटील (अहमदनगर)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply