Take a fresh look at your lifestyle.

कुक्कुटपालन : पोल्ट्री शेड बांधकामाचे ‘हे’ महत्वाचे मुद्दे नक्की वाचा; आहेत खूप उपयोगी

सखल भागातील जागेवर पूर्व-पश्चिम या दिशेला पोल्ट्री शेडचे बांधकाम करावे. कारण अशा पद्धतीने शेडचे बांधकाम न केल्यास उन्हाळ्यात उष्ण हवा आणि पावसाळ्यात पावसाचे सपके पिल्ले व कोंबड्यांना लागून त्या आजारी पडू शकतात. अशावेळी मर वाढून आपले अख्खे पोल्ट्री फर्म झटक्यात तोट्यात जाऊ शकते. हेच टाळण्यासाठी आणि कोंबड्यांची जास्त गर्दी होऊन अमोनिया व इतर विषारी वायूचे प्रमाण वाढून कोंबड्यांवर दुष्परिणाम दिसू शकतात.

Advertisement

शेड बांधकाम करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे :

Advertisement
 • शेडची रुंदी २५ ते ३० फुट इतकीच असावी. यापेक्षा कमी जागा ठेवल्यावर शेड बांधकाम परवडत नाही. तसेच लांब ठेवल्यास शेडमध्ये कोंबड्यांची संख्या वाढून उष्णताही वाढते. त्याचे दुष्परिणाम पक्ष्यांवर दिसतात.
 • ब्रॉयलर पक्षांचा वाढीचा वेग जास्त असतो. त्यांना शेडमध्ये एका पक्षाला प्रत्येकी १ चौरस फुट इतक्या जागेनुसार एकूण पक्षांचे नियोजन लक्षात घेउन शेडची लांबी वाढवावी.
 • यामध्ये उगीचच अंगापेक्षा बोंगा मोठा असा प्रकार करू नये. जागा खूप लांब आहे म्हणून शेडची लांबी वाढवू नये. आपल्या आर्थिक क्षमतेसह उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घालून तज्ञांच्या किंवा अनुभवी कुक्कुटपालकांच्या सल्ल्याने नियोजन करावे.
 • प्रत्येक पिल्लास पहिल्या आठवड्यात ०.२५ चौरस फुट, नंतर दोन आठवड्यापर्यंत ०.५० चौरस फुट आणि तिसऱ्या-चवथ्या आठवड्यात ०.७५ चौरस फुट इतक्या जागेनुसार नियोजन करावे.
 • जर आपण शेजारी-शेजारी दोन किंवा जास्त शेडचे बांधकाम करणार असाल तर, अशावेळी दोन शेडमधील अंतर ५० फुट लांब अंतरावर असावे.
 • शेडच्या आतमध्ये पाणी घुसणार नाही यासाठी जमिनीपासून शेडचा कोबा कमीतकमी दीड फुट उंच घ्यावा.
 • बाजूच्या भिंतीची उंची बाहेरच्या बाजूने ९ फुट तर, आतल्या मधल्या जागेमध्ये १२ फुट असावी.
 • छतासाठी उष्णता कमी निर्माण करणारे सिमेंट पत्रे वापरावेत. तसेच खालचा कोबा चांगला असावा.
 • शेडमध्ये उंदीर, घूस, साप आणि इतर प्राणी घुसणार नाहीत यासाठी योग्य त्या पद्धतीने जाळी लावून घ्यावी. तसेच शेड आतमध्ये आणि त्याच्या बाहेरही स्वच्छ आणि काडीकचरा नसलेले राहील याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
 • शेडच्या वर पक्षांना लागणाऱ्या पाण्याच्या दोन-तीन टाक्या असाव्यात. सर्व भागातील पक्षांना योग्य पद्धतीने स्वच्छ पाणी आणि त्याद्वारे दिले जाणारे औषध मिळेल याची काळजी घ्यावी.
 • दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी ताजे व स्वच्छ असेल याची काळजी घ्यावी. जास्त दिवस साठवून पाणी देण्याचे नियोजन करू नये.
 • आठवड्यातून एकदा पाईपलाईन व पाण्याची भांडी यांची काळजीपूर्वक स्वच्छता करून घ्यावी.
 • शेडच्या आतमध्ये योग्य प्रमाणात उजेड राहील याची काळजी घेऊन इलेक्ट्रिक फिटिंग करून घ्यावी. वीज चालू-बंद करण्यासाठी चांगल्या दर्जाचे टचबटन लावावे.
 • ट्यूबलाईट लावणार असल्यास त्या उत्तर-दक्षिण अशा पद्धतीने लावाव्यात. तसेच शेडच्या बाहेरही उजेडासाठीची सोय करावी. वीज भारनियमन लक्षात घेऊन तिथे एखादे इन्व्हर्टर बसवून घ्यावे.
 • शेडच्या बाहेर सरपटणारे प्राणी व भटके कुत्रे यांच्यामुळे काहीही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नियोजन करावे. मर झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक खोल खड्डा घ्यावा.

यासह आपल्याला गरज वाटतात असे आणि अनुभवी व तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली पोल्ट्री शेडचे बांधकाम करावे.

Advertisement

(क्रमशः)

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement

Advertisement

Leave a Reply