दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) फायदा भारताला होताना दिसत आहे. कारण, या दोन्ही देशांत युद्ध सुरू असल्यामुळे व्यापार जवळपास ठप्प आहे. या देशांकडून दुसऱ्या देशांना विविध वस्तू निर्यात खूप कमी होत आहे. त्यामुळे आयातदार देशांनी दुसऱ्या देशांकडे मोर्चा वळवला आहे. युक्रेन आणि रशियाकडून गव्हाचा (Wheat) सर्वात मोठा आयातदार इजिप्तने (Egypt) आता भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या उपलब्धतेत मोठी घट झाली आहे. हे दोन्ही देश गव्हाचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहेत.
इजिप्तने 2020 मध्ये रशियाकडून $18 अब्ज आणि युक्रेनमधून $610.8 दशलक्ष किमतीचा गहू आयात केला होता. आता इजिप्तला भारताकडून 10 लाख टन गहू आयात करायचा आहे आणि एप्रिलमध्ये त्याला 2,40,000 टन गहू आवश्यक असेल. याबाबत माहिती देताना पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्विट केले की, इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे. शाश्वत अन्न पुरवठ्याच्या विश्वसनीय पर्यायी स्त्रोताच्या शोधात जग असताना, मोदी सरकार पुढे आले आहे. आमच्या शेतकऱ्यांनी साठा भरून ठेवला आहे.
एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान भारताची गहू निर्यात (Export) $ 1.74 अब्ज पर्यंत वाढली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ते $34.017 कोटी डॉलर होते. 2019-20 मध्ये गव्हाची निर्यात $6.184 कोटी होती, जी 2020-21 मध्ये $54.967 कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. भारत गहू प्रामुख्याने शेजारील देशांना निर्यात करतो, त्यापैकी 54% निर्यात बांगलादेशला केली जाते. भारताने येमेन, अफगाणिस्तान, कतार आणि इंडोनेशिया सारख्या देशांतील नवीन गव्हाच्या बाजारपेठेतही प्रवेश केला आहे.
बांगलादेश, नेपाळ, युएई, श्रीलंका, येमेन, अफगाणिस्तान, कतार, इंडोनेशिया, ओमान आणि मलेशिया हे 2020-21 मध्ये भारतातून गहू आयात करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये आहेत. भारत हा गव्हाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि 2020 मध्ये जगातील गव्हाच्या एकूण उत्पादनात त्याचा वाटा सुमारे 14.14 टक्के होता. भारतात दरवर्षी सुमारे 10.759 कोटी टन गव्हाचे उत्पादन होते आणि बहुतांश वापर देशांतर्गत केला जातो.
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला होणार फायदा..! गहू निर्यातीसाठी मोदी सरकारने केलाय ‘हा’ खास प्लान..