दिल्ली : युक्रेनने रशियाकडून सर्व आयातीवर (Import) बंदी घातली आहे, तर रशिया युद्धाआधी त्याच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक होता. युक्रेन रशियाकडून दरवर्षी सुमारे 6 अब्ज डॉलर्सची आयात करत असे. युक्रेनने (Ukraine) इतर देशांना मॉस्को विरुद्ध कठोर आर्थिक निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, कारण त्यांनी रशियाकडून (Russia) सर्व आयातीवर बंदी घातली आहे. युक्रेनच्या मंत्री युलिया सिव्रीडेन्को यांनी शनिवारी सांगितले, की आज आम्ही आक्रमक देशाबरोबरील व्यापार (Trade) पूर्णपणे बंद करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. आतापासून रशियन फेडरेशनची कोणतीही उत्पादने आपल्या देशात आयात करता येणार नाहीत.
24 फेब्रुवारी रोजी रशियाच्या युक्रेनवर आक्रमण केल्यापासून दोन्ही शेजारी देशांमधील वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण बंद आहे. परंतु, शनिवारी युक्रेनने घेतलेल्या या निर्णयामुळे रशियाकडून होणारी आयात थांबवण्याचा कायदा तयार केला आहे. शत्रू देशाच्या बजेटला हे निधी मिळणार नाहीत, ज्यामुळे युद्धासाठी वित्तपुरवठा करण्याची क्षमता कमी होईल. ते पुढे म्हणाले, की “युक्रेनचे असे पाऊल आमच्या पाश्चात्य भागीदारांसाठी एक उदाहरण म्हणून काम करू शकते आणि त्यांना रशियाविरूद्ध निर्बंध मजबूत करण्यासाठी प्रोत्साहित करू शकते, ज्यात ऊर्जा निर्बंध लादणे आणि सर्व रशियन बँकांना वेगळे करणे यांचा समावेश आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन तेल आयात (Oil Import) आणि इतर निर्यातीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन पश्चिमी देशांना सातत्याने केले आहे. तथापि, अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे रशिया आधीच एकाकी स्थितीत आहे. त्याच वेळी, शनिवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले, की रशियावर आणखी निर्बंध टाकले जाणार आहेत.
दरम्यान, गेल्या 46 दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine Wat) सुरू आहे. युक्रेनबरोबरचे युद्ध ही आतापर्यंतची सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे रशियानेही मान्य केले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध संपवण्याबाबत अनेक वेळा बैठका झाल्या, पण गोष्टी प्रत्यक्षात आल्या नाहीत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी काही दिवसांपूर्वी एक मागणी केली होती, की जगभरातील देशांच्या गटाने त्यांना रशियाविरूद्ध सुरक्षेची हमी द्यावी. वास्तविक, झेलेन्स्की यांना नाटोच्या धर्तीवर युक्रेनसाठी स्वतःचा ‘नाटो’ (NATO) तयार करायचा आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सुरक्षा ‘कवच’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. फ्रान्स, तुर्कीसह अनेक देशांनी सुरक्षा हमीदार बनण्यास सहमती दर्शवली आहे.
अर्र.. रशियाविरोधात युक्रेनचा नवा ‘NATO’ ; युक्रेनच्या अध्यक्षांनी भारताकडे केली ही मागणी..