Uddhav Thackeray । आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. ज्याचा उद्धव ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत फायदा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं सर्वाधिक पाठबळ हे एकनाथ शिंदे यांनाच मिळाले. निवडणूक आयोगात ठाकरे गटाला सतत निराशा मिळाली. पण पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला असल्याने ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सूत्रांकडून माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या गटाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येईल. यामुळे ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबत धाव घेत मागणी केली होती. आता ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
त्यामुळे सध्या पक्षात प्रचंड हालचाली सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं असून काही ठिकाणी अतिशय थोड्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून आणाव्यात यासाठी ठाकरे गटात रणनीती आखली जात आहे.