Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले ॲक्शन मोडवर! घेतली मोठी जबाबदारी

Udayanraje Bhosale : साताऱ्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा मोठा विजय झाला आहे. अशातच काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेची देखील निवडणूक अटीतटीची होऊ शकते.

अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उदयनराजे भोसले हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, “तुम्ही अतुल भोसले यांना निवडून आणा, त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी आहे. मी त्यांच्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणार. माझ्या विजयाची परतफेड मी अतुल भोसले यांच्यासाठी करणार आहे. त्यांच्यासाठी जिवाची पराकाष्ठा करणार, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे”.

पुढे उदयनराजे भोसले म्हणाले की, “मला पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा जनतेच्या हृदयातील स्थान महत्त्वाचे वाटते. आगामी विधानसभा निवडणुक दोन ते तीन महिन्यावर येऊन राहिली आहे. त्यामुळे आपल्यासाठी एकेक दिवस महत्त्वाचा समजून आजपासून कंबर कसून कामाला लागा,” असे आदेश देखील उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

यावर अतुल भोसले म्हणाले की, “कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून मताधिक्य देण्याचा आम्ही चंग बांधला होता. कार्यकर्त्यांनी देखील मनावर घेतले असल्याने उदयनराजे भोसले यांना चांगले मताधिक्य मिळाले.” ते नारायणवाडी (ता. कऱ्हाड) येथे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजयी आभार मेळाव्यात बोलत होते.

यावेळी भाजपचे नेते अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, सुनील काटकर, संग्राम बर्गे, विक्रम पावसकर, माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, सुहास जगताप, कृष्णेचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, प्रा. मच्छिंद्र सकटे, कऱ्हाड दक्षिण भाजपचे अध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, कऱ्हाड शहरचे अध्यक्ष एकनाथ बागडी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment