केंद्रीय मंत्री दानवेंच्या ‘त्या’ दाव्याने उडालीय खळबळ.. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दिलेय जोरदार प्रत्युत्तर..
मुंबई : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष सतर्क झाले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी दानवे यांच्या या दाव्यावर जोरदार टीका केली आहे.
राऊत म्हणाले, की ते 25 म्हणाले कदाचित त्यांना 125 म्हणायचे असेल. की 125 आमदार महाविकास आघाडीचे आमच्या संपर्कात आहेत. उद्या मी म्हटले, की तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत.. आणि आहेतच. तर तुम्ही काय म्हणाल, असे राऊत म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही दानवे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. दानवे हे फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात, असे खडसे म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे नेते वेगवेगळे भविष्य वर्तवत असतात. चंद्रकांत दादांनी तर अनेक तारखा दिल्या. मात्र, त्या तारखा मागे घेतल्या गेल्या म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे फक्त स्वप्न पहात आहेत. दानवे यांच्या फक्त मनोरंजनाच्या गप्पा सुरू आहेत. खरे तर आता कोणत्याही आमदाराची पक्ष बदलण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे दानवे यांनी नुसते हवेत तीर सोडू नये, असा उल्लेखही त्यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हा दावा केल्यानंतर आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष सतर्क झाले आहेत. या तीन पक्षांकडून आता विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. राज्याच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. भाजपने याआधीही सरकार पडणार असल्याचे अनेक वेळा म्हटले होते. त्यामुळे मंत्री दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.