मुंबई : पंजाबमध्ये मोठ्या विजयानंतर आम आदमी पक्षाचे (AAP) लक्ष आता तेलंगाणाकडे लागले आहे. पक्षाच्या नेत्यांनी पक्षाचे नवे राजकीय लक्ष्य दक्षिण भारतीय राज्य असेल, असेही संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, आम आदमीच्या या हालचालींमुळे राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या तिसऱ्या आघाडीचे नियोजन संकटात येऊ शकते. तेलंगणा राष्ट्र समितीचे केसीआर हे भारतीय जनता पक्षाविरोधात बिगर-काँग्रेस तिसरी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलंगणातील आप नेते पक्ष भक्कम करण्यावर भर देत आहेत. द न्यूज मिनिट वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ आप नेते बी. रामू गौर यांनीही आप आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्यात आघाडी होण्याची शक्यता नाकारली आहे. “आमच्या नेतृत्वाने याबाबतीत कोणतेही स्वारस्य दाखवले नाही, तसेच कोणत्याही आघाडीसाठी टीआरएस नेत्यांबरोबर कोणतीही चर्चा केलेली नाही.
केसीआर आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. याआधी केसीआर यांनी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड आणि महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतली आहे. तथापि, टीएनएमनुसार, पक्षाच्या सूत्रांनी केजरीवाल आणि केसीआर यांच्यातील बैठक पुढे ढकलल्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, त्या दिवशी अशी कोणतीही बैठक होणार नव्हती.
‘आम आदमीच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून पक्षाची नजर आता तेलंगणाकडे असल्याचे संकेत याआधीच मिळाले आहेत. तसेच, आप सत्ताधारी टीआरएसला टक्कर देणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे दक्षिण भारत प्रभारी आणि दिल्लीचे आमदार सोमनाथ भारती यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. केजरीवाल यांच्या तेलंगणा दौऱ्यानंतर येत्या काही दिवसांत अनेक निवृत्त सरकारी अधिकारी पक्षात येण्यास तयार असल्याचा दावा आपने केला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठीही पक्ष काम करेल, असे पक्षाने म्हटले आहे.
भविष्यात ‘आप’ भाजपला देणार ‘ताप’..? ; जाणून घ्या, काय म्हटलेय भाजप नेत्यांनी..