मुंबई : देशातील 5 विधानसभा निवडणुकीत झालेल्या दणदणीत पराभवामुळे काँग्रेस पक्षात राजकीय वादळ उठले आहे. त्यामुळे रविवारी अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी G-23 गटाने शुक्रवारी यासंदर्भात बैठकही घेतली होती. पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी जोर धरू लागली आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत तर जबरदस्त झटका बसला आहे. काँग्रेसने पंजाबसारखे मोठे राज्य गमावले. आणि उर्वरित राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज रविवारी दुपारी चार वाजता बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये पुढील रणनितीचा विचार केला जाईल.
उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन टक्के मते मिळाली आणि 403 जागांपैकी केवळ दोनच जागा जिंकता आल्या. पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस पक्षासाठी सर्वात निराशाजनक होते. येथे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा दोन्ही विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. पक्षाचे प्रदेश प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचाही पराभव झाला. या दोन्ही दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या नवोदितांनी पराभव केला. यावेळी पंजाबमधील 77 जागांवरून जनतेने काँग्रेसला फक्त 19 वर आणून ठेवले. या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांनी या पराभवावर चिंता व्यक्त केली. या मुद्द्यावर G 23 नेत्यांची काल बैठकही झाली. या बैठकीत काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे करण्यात आली. या बैठकीत कपिल सिब्बल आणि मनीष तिवारींसह काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यानंतर आता रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. आता या बैठकीत काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Uttarakhand Election 2022 : मुख्यमंत्री पदाबाबत नवीन अपडेट; ‘या’ उमेदवारांची नावे आघाडीवर..
UP Election Result : निकालानंतर अखिलेश यादव यांनी दिलीय प्रतिक्रिया; ‘त्यासाठी’ मानलेत जनतेचे आभार..