Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog : ‘डॉ. कोल्हेसाहेब, इंग्रजांची नाही हो माफी मागायची.. देशाची माफी मागा..!’

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एका चित्रपटात दिवंगत दहशतवादी नथुराम गोडसे याची भूमिका करीत आहेत. त्यांनी असे केल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पुण्यातील हर्षल लोहकरे, संजय झिंजाड व शंभुसिंह चव्हाण या तरुणांनी याबद्दल गांधीगिरी आंदोलन करून देशाची माफी मागण्याचे आवाहन त्यांना केले आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिवसभर डॉ. कोल्हे यांचे घर आणि कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र, डॉ. कोल्हे यांनी फोनवरून चर्चा करताना देशाची माफी मागणे टाळले आहे. याबद्दल हर्षल लोहकरे, संजय झिंजाड व शंभुसिंह चव्हाण यांनी फेसबुकवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

Why i killed gandhi या चित्रपटामध्ये खा. अमोल कोल्हे यांनी गांधीजींचा मारेकरी दहशतवादी नथुराम गोडसे याची भूमिका साकार केली आहे. हा चित्रपट गांधी हत्येची चौकशी करणाऱ्या कपूर आयोगाच्या अहवालातील नथुराम च्या जवाबावर आधारित आहे, असे समजते. या चित्रपटाच्या माध्यमातून नथुरामने केलेली गांधी हत्या कशी योग्य होती, हे दाखविण्यात असल्याचे ट्रेलरमध्ये समजते. मूलतः नथुरामची गांधी विषयीची भूमिका ही धादांत खोटी, वस्तुस्थिती ला धरून नसलेली होती, हे गांधीजींच्या खुनाच्या त्या आधी झालेल्या प्रयत्नातून समजते. या चित्रपटातून देशद्रोही नथुरामला हिरो व हुतात्मा ठरविण्याचा प्रयत्न केला आहे, असे आम्हाला वाटते. नथुरामची वैचारिक विकृती व भूमिका कोल्हे यांना का आव्हानात्मक वाटली हे एक कोडे आहे. गांधीहत्येवर पुराव्यावर आधारलेली काही पुस्तके आम्ही कोल्हे यांना आज २६ जानेवारी रोजी नारायणगाव येथील त्यांचे कार्यालय व घर येथे नेऊन दिली व त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन व्हावे, यासाठी गुलाबाची फुले व पुस्तके ही दिली. यामध्ये प्रामुख्याने य दि फडके यांचे नथुरामायन, प्रमोद कपूर यांचे गांधी सचित्र जीवन दर्शन, रावसाहेब कसबे यांचे गांधी, अशोक कुमार पांडे यांचे त्याने गांधींना का मारले, सुरेश द्वादशीवार यांचे गांधीजी आणि त्यांचे टीकाकार, चंद्रकांत वानखडे यांचे गांधी का मरत नाही ? यासह रमेश पानसे यांचे नवी तालीम आणि गांधी नव्याने समजून घेऊया आदी पुस्तकांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

गांधीजींचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, त्यांचे वैचारिक आत्मबळ आणि सत्याग्रहाची शक्ती ही आमची प्रेरणा आहे. गांधींच्या विचारांचा विपर्यास केला असल्याची शक्यता या चित्रपटातून व्यक्त होऊ शकते, असे ट्रेलरवरून लक्षात येते. त्यामुळे नथुरामला हिरो करणे व गांधीजींना खलनायक ठरवणे आम्हाला कदापिही मान्य नाही. त्यामुळे सन २०१७ मध्ये कोल्हे यांनी केवळ कलाकार म्हणून ही भूमिका केली, हे न पटणारे आहे. आज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी या बद्दल देशाची माफी मागावी.. अशी आमची मागणी राहिली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून खा. कोल्हे यांनी माफी तर दूर, साधा खेदही व्यक्त केलेला नाही. याबाबत आमची भूमिका सांगण्यासाठी व त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी आम्ही नारायणगाव येथे आज गेलो होतो. कोल्हे हे बाहेरगावी असल्याने त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले, ज्यामध्ये येत्या काळात कोल्हे यांनी गांधीजींवर कलाकृती घेऊन येण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे. केवळ अमोल कोल्हेच नव्हे तर त्यांच्यासह चित्रपटाचे निर्माते, दिगदर्शक व नथुरामची भूमिका करणारे कलाकार यांनी देशाची माफी मागणे आवश्यक आहे.

Advertisement

या मागणीसाठी आम्ही त्यांच्या घराबाहेर व नारायणगाव येथील कार्यालयासमोर असे दोन्हीही ठिकाणी सविनय सत्याग्रह केला. त्यानंतर कोल्हे यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, डॉ. कोल्हे यांच्याशीही फोन द्वारे सविस्तर बोलणे झाले. पण देशाची माफी मागण्याची ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. आम्ही त्यांना केवळ देशाची माफी मागा, असे आवाहन केलं होते, इंग्रजांची माफी मागण्याचे नव्हे! हे ही त्यांना स्पष्ट सांगितले. दरम्यान पोलिसांनी आम्ही सत्याग्रहासाठी बदलेल्या ठिकाणी येऊन आम्हाला चौकशीसाठी ताब्यात घेतले व चौकशीनंतर सोडूनही दिले. येत्या काळात छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी या व्यक्तिरेखांप्रमाणेच गांधी विचारांना न्याय देणारी भूमिका ही सभागृहात व सभागृहाबाहेर कोल्हे यांनी करणे अपेक्षित आहे. दिनांक ३० जानेवारी रोजी गांधीहत्येवर आधारलेला why i killed gandhi हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे, त्याबाबत निर्माते व दिगदर्शक व कलाकार यांचा आम्ही निषेध करतो आहोत. तसेच विविध सविनय सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधी विचारांचा जागर देशातील सर्व गांधी अनुयायांनी करण्याचे आम्ही आवाहन करत आहोत.  @आपले हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण

Advertisement
Advertisement

Leave a Reply