मोठी बातमी..! म्हणून राज्यातील महाविद्यालये राहणार ‘इतके’ दिवस बंद; राज्य सरकारने घेतलाय महत्वाचा निर्णय
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने आज एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
याआधी मुंबई मनपानेही शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कॉलेज बंद ठेवली जाणार आहेत. तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली.
राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेजेस हे येत्या 15 फ्रेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कॉलेज परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सर्व विद्यापीठांनी तशी मान्यता दिली आहे. जळगाव, नांदेड अशा जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटीची अडचण लक्षात घेता या जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यापीठांना हेल्पलाईन सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व वसतिगृह बंद करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे यंदाही सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत, अशी घोषणा तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी यासाठी परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंदाही महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.