“गांधींबद्दल कुणीतरी काहीतरी बोलतं आणि आपण त्याला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात करतो, गुन्हे दाखल करतो आणि गंमत म्हणजे इथेच गांधी पराभूत होतात. अशा लोकांना गांधी काय म्हणाले असते? मित्रा, तुझं मन प्रचंड दूषित झालेलं आहे, ते तुझ्यासाठीच त्रासदायक आहे, माझ्यावर टीका करून तुला समाधान मिळत असेल तर खुशाल टीका कर, पण त्याला प्रत्युत्तर म्हणून मी तीच कृती करणार नाही, तर तुझं मन शुद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करणार, आणि त्यासाठी आयुष्यभर तुझी टीका ऐकायची माझी तयारी आहे… या संयमी वृत्तीने गांधी आपोआपच विजयी होतात, त्यासाठी कुणी त्यांचा ठेका घेण्याची गरज नसते”, असे श्रीकांत आव्हाड (वकील आणि बिजनेस कन्सल्टंट, अहमदनगर) यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी याबाबत मत मांडले आहे. तेच आम्ही इथे जसेच्या तसे प्रसिद्ध करीत आहोत. Shrikant Avhad | Facebook
गांधी बनणं सोपं काम नाहीये, भल्याभल्यांना ते शक्य नाहीये. स्वतःला गांधीवादी म्हणारेसुद्धा प्रत्यक्षात गांधींच्या आसपासही भटकत नाहीत. गांधींवर गावागावात जाऊन लेक्चर देणारे, त्यांचा उदोउदो कितीतरी प्रत्यक्षात कट्टर आणि हिंसक मानसिकतेचे असलेले लोक आपल्या आसपास आहेत. प्रचंड हिंदुद्वेषी आहेत आणि गांधीवादी म्हणवतात असे तर मागच्या ५ वर्षात जागोजागी दिसायला लागले आहेत. पण ते गांधींचा ठेका घेतात म्हणून गांधी त्यांचे होत नाहीत. गांधी त्यांच्यापासून कधीच दूर निघून गेलेत. त्यांच्यासाठी गांधी त्यांच्या राजकारणची गरज आहे. त्यांची गांधी नकोय. बिलकुलच नको आहे. यांना गांधी झेपलेलेच नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून गांधींकडे बघणे हा गांधींच्या विचारांशीच प्रतारणा ठरेल.
गांधी मारत का नाही? या प्रश्नाचं उत्तर खूप अवघड नाहीये. गांधींचा कुणी ठेका घेतलेला नाही म्हणून ते आजपर्यंत जिवंत आहेत, जनतेच्या मनात ठाण मांडून बसलेले आहेत. ज्यादिवशी कुणीतरी आपल्या राजकारणासाठी त्यांचा ठेका घ्यायला सुरुवात करेल, त्यादिवसापासून ईतर महापुरुषांप्रमाणेच गांधींच्या संपण्याची सुरुवात झालेली असेल. आणि तो ठेका आता काही लोक घ्यायला लागलेले आहेत. महत्वाचं, हिंदूंचा कुणी धर्मगुरू नाहीये,. हिंदू कोणत्याही धर्मगुरूंच ऐकत नाहीत… असे कितीतरी स्वयंघोषित धर्मगुरू कोललेत हिंदूंनी. धर्मगुरूंचा आदेश प्रमाण मानून त्याप्रमाणे कृती करायची पद्धत इतर धर्मात आहे, हिंदूंनी हि पद्धत कधीच कालबाह्य ठरवली आहे. त्यामुळे कुणीतरी स्वतःला हिंदूंचा धर्मगुरू म्हणून काहीतरी बोलतोय म्हणून तो समस्त हिंदूंचा प्रतिनिधी होत नाही. गांधी कधी मरू शकत नाही, आणि कट्टरवाद कधी जिंकू शकत नाही. या देशातील बहुसंख्याकांनी अजूनतरी आपलं तारतम्य गमावलेलं नाही.