Take a fresh look at your lifestyle.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा कानमंत्र; पहा नेमके काय आहे वास्तव आणि अनुभव

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे, पोलिसी गोल टोपी मिरवणे किंवा रुबाबात गाडीत फिरण्याचे स्वप्न ठेवणे काही चूक नाही. मात्र, अनेकदा असे होते की, आपण आपली क्षमता आणि गुणवत्ता याचा ताळमेळ न बसवता या फंदात पडून आपले आयुष्य वाया घालवतो. काहींना यश मिळते. मात्र, ते खूप मोजके असतात. तर, अनेक गुणवत्तापूर्ण मंडळी आपला महत्वाचा वेळ या चक्रव्यूहात खर्ची घालतात. माध्यमांच्या बातम्या आणि सामाजिक स्टेट्स यामुळे हे चक्रव्यूह आणखी घट्ट होत आहे. त्यातच या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशावेळी नेमके काय करावे किंवा या फंदात पडून ‘देशसेवा’ करावी किंवा नाही हेही प्रश्न आहेत. यावर क्वोरा या प्रश्नोत्तरे वेबसाईटवर एक उत्तम चर्चा झालेली आहे. त्याचे महत्वाचे अंश आम्ही वाचकांसाठी जसेच्या तसेच येथे प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement

‘स्पर्धा परीक्षा हे खरोखरच मृगजळ आहे का?’ हा प्रश्न सध्या खूप महत्वाचा आहे. हे काही मृगजळ नाही, ना यशाची खात्री असलेला बेस्ट पर्याय. आपले आपण यातले समजून घेऊन पुढे जावे आणि यश मिळवावे. यावर युट्यूबवर प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व कीर्ती मुळे यांनी सविस्तर मांडणी करताना म्हटलेय की, “हो माझ्यासाठी तरी ते होते. मला खूप उशीरा लक्षात आले त्यामुळे माझी ४ वर्षे वाया गेली. मी एक साधारण विद्यार्थीनी होते. फार अभ्यास केला तर जेमतेम ७०-७५% पडायचे. गणित आणि विज्ञान, काही भाषा विषयांमध्ये सर्वोच्च यायचे वर्गात. त्यामुळे मला असे वाटायला लागले होते की मी खूप हुशार आहे. मी जॉब न करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करायचे ठरवले. बऱ्याच वेळा अगदी थोड्या गुणांनी जायचे त्यामुळे वाटायचे पुढच्या वेळी नक्की होईल. पण जसजशी वर्षे सरत जातात तसतसे आपण हतबल (बर्न आऊट) होऊ लागतो. त्यातून ह्या स्पर्धा परीक्षेत किती राजकारण आहे हे पण आपल्याला काही माहिती नसते. छोट्या शहरात असल्यामुळे क्लास नसायचे त्यामुळे मार्गदर्शनही मिळायचे नाही. स्वतःलाच सगळे ठरवावे लागायचे. ज्या पुस्तकांची खूप कौतुक ऐकलेली असायची ती सगळी विकत घेतली त्यातून अभ्यासही केला, पण प्रत्यक्ष परीक्षेत इतके वेगळे काहीतरी यायचे की त्याच्यापुढे ते पुस्तकातले बालिश वाटायचे. मुद्दामहून पुस्तकात काहीतरी सोप्पे सोडवून देतात की काय असे वाटायचे.”

Advertisement

कीर्ती मुळे यांनी पुढे लिहिले आहे, “मला हे पचवणे खूप अवघड गेले, की मला नाही जमणार हे. ४ वर्षे गेलेली होती, माझे करिअर संपलेले होते. एका परिचितांच्या ओळखीने एका बँकेत नोकरी मिळाली ते नशीब. १ वर्षातच पगारवाढ मिळाली. तिथली माझी व्यवस्थापक (मॅनेजर) मला म्हणाली तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तू इथे लागली असती तर बहुतेक आज व्यवस्थापक (मॅनेजर) असती. स्पर्धा परीक्षा म्हणजे सगळे काही नसते, त्याच्याशिवायही आपण चांगले यश मिळवू शकतो. आजकाल मोटीवेशन हा शब्द फार प्रचलित आहे. हा शब्द इतका जोरदार आपल्यावर मारला जातो ना की त्याच्या आवाजात आपला अंतरात्म्याचा आवाज दबून जातो. आतला आवाज आपल्याला सांगत असतो की, तू ह्यापेक्षाही दुसर काहीतरी खूप चांगले करू शकते, हे जर खूप अवघड असेल तर सोडून दे. पण नाही दुसऱ्याच्या ज्या यशस्वी, संघर्षपूर्ण नेट वर गोष्टी ऐकतो ना आपण तेव्हा भुलतो. अरे हा तर किती गरिबीतून आला, किती माठ होता हा शाळेत आणि MPSC पास झाला. त्यांच्या गोष्टी आपण ऐकतो आणि स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवतो, कधी २ तासाच्या वर सलग एक आठवडा अभ्यास न करणारे आपण, आता ८-८ तास मी दिवसाला अभ्यास करेन असा चंग बांधतो. भरत आंधळेंं च नाव ऐकले असेल तुम्ही. ते शालेय जीवनात साधारण पेक्षाही खालचे विद्यार्थी होते. १० वी मध्ये ५४% आणि UPSC पास आहेत. ते खूप खेड्यातून आलेले, त्यांचे संभाषण ऐकले की कळतेच. त्यांच्या युट्युब वरच्या भाषणाने काही मुले प्रेरित आणि यशस्वी झाली असतील नक्कीच, पण त्यांच्यामुळे किती जास्त प्रमाणात काही मुलांनी आपली महत्वाची वर्षे स्पर्धा परीक्षांमध्ये वाया घातली असतील याचा हिशोब नक्कीच मूठभर यशस्वी मुलांपेक्षा जास्त आहे.”

Advertisement

“मला स्पर्धा परीक्षांना विरोध अजिबात नाही, माझा विरोध आहे की स्पर्धा परीक्षाच सगळे काही आहे ह्या वातावरणाला. हजार असे मार्ग आहेत ह्या परीक्षा सोडून ज्यात आपण यशस्वी होऊ शकतो, आणि आजकालची मुले खूप हुशार आहेत, ती करतीलही. पण त्यांना तेवढा मोकळा विचार करण्यासाठी वातावरण तर हवे. श्रीमंत व्हायचेच, यशस्वी व्हायचेय तर एकच मार्ग स्पर्धा परीक्षा. असे का? मी असे खूप तरुण पाहिलेत जे ह्या वेडापायी १० वर्षांपासून तयारी करत आहेत. त्यांना सांगितले गेले पाहिजे १-२ वर्षे बास, त्यापुढे सरळ नोकरी करा, व्यवसाय करा, ते करत असताना जमले तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा अजूनही कीडा डोक्यातून जात नसेल तर. पण १-२ वर्षापेक्षा जास्त स्पर्धा परीक्षांना पूर्ण वेळ द्यायचा नाही. खरंच हे मृगजळ आहे, प्रश्नात योग्य शब्द वापरलाय. कोटा मध्ये दरवर्षी किती आत्महत्या होतात. मला असे वाटते मला त्या काळात कोणी सांगणारे हवे होते हे. पण तेव्हा मी स्वतःला इतके मोटीवेट करून घेतले होते की खरच फार कुणाचे ऐकले नसते. मी ह्यातून बाहेर पडले संदीप माहेश्वरीचा एक विडिओ बघून. बाकी सगळे जग स्पर्धा परीक्षांचे गोडवे गात होते, आणि फक्त हा एकटा माणूस डोळ्यावरची पट्टी काढत आहे असे मला वाटले. मी खचून न जाता ह्या विडिओ मुळे ह्या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडले. माझी खूप इच्छा आहे की मी इतरांनाही ह्या धोक्याबद्दल सांगावे. आपल्यामध्ये दुसरे काहीतरी इतके मोठे कौशल्य असू शकते, त्याची जाणीव आपल्याला आपली शिक्षण पद्धती होऊच देत नाही. इतके ग्रासून टाकलेय आपल्याला ह्या भुताने की आपल्याला सगळे दुसरे मार्ग दिसणे बंद होऊन जाते. जो खरच हुशार आहे, ज्याला माहीत आहे आपण ही परीक्षा पास करू शकतो आपण त्यासाठीच बनलो आहोत. त्याने ते जरूर करावे, पण कृपया इतर अभ्यासामध्ये साधारण असलेल्या मुलांना माफ करा, त्यांना ह्यात अडकवू नका. विडिओ चा दुवा देत आहे, जे संभ्रमामध्ये स्पर्धा परीक्षा देत आहेत, कृपया त्यांनी एकदा हा विडिओ नक्की बघावा, भविष्यात नक्की कामी येईल. दिमाग खोलने वाला विडिओ,” असेही कीर्ती मुळे यांनी अखेरीस म्हटलेले आहे.

Advertisement

संगणक अभियांत्रिकी विषयाचे संग्राम शिंदे यांनी यावर म्हातालेय की, “मला पण उत्तर द्यावस वाटलं पण बरेचशे मुद्दे अगोदरच कव्हर झालेले दिसताहेत. तरी माझा अनुभव लिहावासा वाटतोय. 2014 ला मी साधारण 8 ते 9 महिने 12 ते 13 तास अभ्यास केला, फक्त झोपायला रूम वर जात असू आम्ही, बाकी शास्त्री रोड वरच्या अभ्यासिकेत. जवळच मेस, जवळच नाष्ट्याचा अड्डा, बघावे तिकडे गटाने वा एकटे, हातात नोट्स नाहीतर कोळंबेंच अर्थशास्त्र घेऊन फिरणारे, आता येणाऱ्या ऍड मध्ये काहीतरी होईल अशी आस लावून अभ्यास करणारे, काही परिस्थितीचा अभ्यास आणि भान न ठेवून भाषणं ऐकून पेटून उठलेले तर काही-काहीच करायला नाही म्हणून MPSC करणारे. तर साधारण 7 महिने अभ्यास केल्यानंतर स्वतःला चाचपून बघायचं ठरवलं, मागच्या 2 ते 3 वर्षाचे निकाल डाउनलोड केले, गुण तालिका बघितल्या तर मागच्या वर्षी जे क्लास-टू म्हणून निवड झालेले त्यातले काही या वर्षीच्या क्लास-वन च्या लिस्ट मध्ये होते. म्हणजे प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेमध्ये पूर्ण तयारी झालेले आणि क्लास वन साठी प्रयत्न करणारे अधिकारी, 3/4 वर्षांपासून तयारी करणारे पण 2, 3 गुणांनी पोस्ट गमावणारे. आणि या सर्वांसोबत बाकीचे सगळे, पण पद मिळण्यासाठी प्रामुख्याने पहिल्या दोन वर्गांसोबत शर्यत. तर ही सगळी स्पर्धा एकीकडे आणि MPSC च्या जागेची जाहिरात एकीकडे. म्हणजे स्पर्धेत उतरणारे लाखोंच्या संख्येने आणि जागा 300/450. त्यामध्ये सगळ्यांच्या राखीव सोडून 5 नाहीतर 10 खुल्या वर्गासाठी.”

Advertisement

संग्राम शिंदे यांनी पुढे म्हटलेय की, “म्हणजे ओंजळीच्या तहानेसाठी थेंबाने पुरवठा. ते 7 महिने फक्त मला अभ्यास समजून घ्यायला लागले म्हणजे रोज एवढा अभ्यास केल्यावर मला अंदाज आला की परीक्षेचा आवाका किती मोठा आहे कोणत्या प्रकारच्या मुद्द्यावर कसे प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरे कशी सोडवावी लागतील. नवीन अभ्यास करणार्यांना MPSC चा पेपर बघून वाटू शकतं, यात काय आहे हे तर किती सोपं आहे आणि हे समजायला एवढे दिवस. पण रणांगणात उडी मारल्याशिवाय युद्धाचा आवाका कळत नसतो. तटस्थ राहून स्वतः स्वतःचे प्रमाणिकपणे आत्मपरीक्षण किमान याबाबतीत तरी प्रत्येकाने करावे असं मनोमन मला वाटतं कारण आजही अजूनही अभ्यास करणारे माझे मित्र आहेत, चिकाटी त्यांनी सोडलेली नाही पण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. तर या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर, माझा झालेला अभ्यास, दरवर्षी निघणाऱ्या जागा, त्यासाठी असणारी अटीतटीची स्पर्धा या सगळ्या शक्यता धरून मला 2 ते 3 वर्ष तरी हातात जॉब येण्यास लागणार होते.(जर पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालो असतो तर) म्हणजे 2017/18. इंजिनिअरिंग नंतर पडू शकणारा गॅप आणि त्यामध्ये नोकरी मिळवण्याच्या कमी होणाऱ्या संधी – डोक्यात सतावणारा प्रश्न. तर ते 9 महिने माझी कॅलक्युलटेड रिस्क होती. स्पर्धा परीक्षा मध्ये जेवढा वेळ तुम्ही घालवाल तेवढं जास्त तुम्ही आतमध्ये रुतून बसत जाता, जास्त रुतलो नव्हतो तर लगेच बाहेर येऊन settle व्हायला जास्त कष्ट नाही लागले. सांगण्याचे मुद्दे असे की प्रत्येकाने स्वतःला विचारावे की मला का हवाय हाच जॉब, अशी कोणती गोष्ट आहे जी मला फक्त स्पर्धा परीक्षाच देऊ शकते. समाजात खरंच बदल घडवायचा असेल तर एक तर तुम्ही जास्त उच्च पदावर असलं पाहिजे, मधल्या अधिकाऱ्यांची समाजात बदल घडवण्याची उमेद वरून एक फोन आला की गाळात जाऊ शकते. मग येणारी निराशा तुमची फॅमिली लाईफ खराब करायला पुरेशी ठरू शकते. नाउमेद करायची इच्छा नाहीये पण झालं तर IAS नाहीतर DC नाहीतर जे आहे ते उत्तम. हे मृगजळ आहे ते खरं आहे, ज्याकडे बघत चालणारे चालतच राहू शकतात आणि जे बदल घडवू म्हणतात त्यांचे हात सिस्टिम ने बांधले जाऊ शकतात. सक्सेस स्टोरीपेक्षा या वास्तवाची जास्त गरज आहे असं मला वाटतं. नीट बघितलं तर बाहेर अमाप संधी आहेत, आयुष्यातली ही वर्षं खूप खूप महत्त्वाची, त्यात नीट प्लॅन केला तर घडी नीट बसू शकते नाहीतर नैराश्य येण्यास वेळ लागत नाही. प्रत्येकाने आपली रिस्क कॅपॅसिटी, वेळ, पैसा, क्षमता बघून यात पडावं कारण अनिश्चितता आणि संयमाच्या कसोटीनं पुरेपूर भरलेलं हे क्षेत्र आहे.”

Advertisement

मनोज धायगुडे (अधिकारी भारत सरकार) लिहितात की, होय स्पर्धा परीक्षा हे नक्कीच एक मृगजळ आहे. मुळात आपली शिक्षण व्यवस्था एकदम ढिसाळ आहे,ज्याला लेखी परीक्षेत जास्त मार्क्स तो जास्त हुशार असे समजले जाते पण प्रत्यक्ष काम करायचे म्हंटले की एखादा ITI वाला मुलगा एक अभियंता असलेल्या मुलावरही किती भारी पडतो याचा मला अनुभव आहे.त्यामुळे काही नोकरी मिळाली नाही की लगेच स्पर्धा परीक्षा हा पर्याय मुले निवडतात .याची प्रामुख्याने दोन कारणे देतो-

Advertisement
  • जेव्हा लोकसेवा / राज्यसेवा परीक्षेचा निकाल घोषित होतो तेव्हा प्रसारमाध्यमातून रिक्षावाल्याला मुलगा,शेतकऱ्याची मुलगी,अनुसूचित जातीतून हा पहिला,दुष्काळी भागातील मुलाचे यश अशी काही मोजकीच उदाहरणे देऊन लोकं नकळत त्याच्याशी भावनिक नाळेने जोडली जातात.कोणत्याच शेतकऱ्याला वाटत नसते की त्याचा मुलगा शेती करावा ,म्हणून तो त्या गावच्या शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाला म्हणून माझा मुलगा सुद्धा होईल या अपेक्षेवर बसतात.शिवाय हल्ली विश्वास नांगरे पाटील सर हे ग्रामीण भागातील मुलांचे आदर्श व्यक्तिमत्व झाले आहेत जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांचेतरी.नांगरे सरांना १०,१२,पदवीला किती गुण होते ? त्यांची घरची परिस्थिती कशी चांगली होती ? व त्यांनी केलेली मेहनत या गोष्टी सोडून फक्त गावाकडील आहेत म्हणून लगेच मुले आपणही होऊ ही अपेक्षा घेऊन अभ्यास करतात.कधी थांबायचे हेही वेळेत कळायला हवे मुलांना. काही मुले ही सरकारी नोकरी लागली की चांगल्या दिसणाऱ्या मुलीशी लग्न होईल व हुंडा खूप मिळेल या अपेक्षेनेही तयारी करतात.
  • दुसरे कारण म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे एकदम आरामाची,खूप पैसे खायला मिळतो असा लोकांचा गैरसमज .एकदा ही नोकरी लागली की आयुष्य सार्थक झाले असा लोकांचा चुकीचा समज ,एकदा निवड झाली की त्यानंतर काही कष्ट करावे लागत नाहीत हा मोठा गैरसमज. समाजामध्ये विनाकारण मिळणारी प्रतिष्ठा हेही एक कारण आहे .एखादा व्यक्ती अगदी मॅनेजर पदावर असेल तरीही लोक वर्दीतील माणसाला किंवा अधिकारी व्यक्तीला जास्त सन्मान देतात.खरंच याची काय गरज आहे का हे तुम्हीच ठरवा.

आता खरी परिस्तिथी काय आहे हेही सांगतो-

Advertisement

अभ्यास करणारी संख्या खूप असली तरीही अर्ध्याहून मुले शहरात आली की खूप वेळ वाया घालवतात. नवीन असतात मग जावा चित्रपट पाहायला,जावा फिरायला,मोबाईल वर क्रिकेट सामने पाहत बसतात तासनतास,वेबसिरीज सकाळी आल्यापासून बघत बसतात रात्री उशिरापर्यंत,काही मुलीच्या नादीही लागतात,जिमला पैसे घालवणारेही आहेत ,तर काही फक्त मित्र करत आहे अभ्यास म्हणून करतात .त्यामुळे खरी स्पर्धा ही दर १०० मुलांमागे ३०-३५ मुलांमध्येच असते.काहीकाही खूप हुशार असतात ,पूर्व -मुख्य परीक्षा पास करूनही गुणवत्ता यादीत येत नाहीत .यात नशीब सुद्धा महत्वाचे असते .आरक्षण असते,जागा कमी निघत आहेत हल्ली,परीक्षा वेळेवर होत नाहीत म्हणून तीच तीच मुले पास होत आहेत बऱ्याच परीक्षा.व एकदा निकाल लागला की हीच अधिकारी मुले खूप खोटी बोलतात की मी वडापाव खाऊन दिवस काढले ते .मला माहित आहे ना बिर्याणी व दारू किती वेळा प्यायचे हे लोक आठवड्यातून . कोचिंगवाले आपला धंदा चालवण्यासाठी लगेच सत्कार समारंभ,व्याख्याने,कार्यशाळा व सध्या मार्केटिंग इंटरनेटमुळे कमी वेळात अधिक लोकांपर्यंत पोहचता येत असल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. स्पर्धा परीक्षा करायची असेल तर – १)आपल्याकडे पैसा असणे महत्त्वाचे आहे व सर्व अभ्यास व्यवस्थित झाला तर २-३ वर्ष द्यावीत त्यातुन अंदाज येतो की आपली निवड होईल की नाही ते. २)आपण स्वतः निर्णय घेतला असेल व मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल.संयम खुप लागतो.कारण शेवटी ही स्पर्धा परीक्षा आहे जो टिकेल तोच जिंकेल.

Advertisement

माध्यमिक शिक्षक अविनाश पाटील लिहितात की, “2011 पासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. पण त्याच बरोबर मी एका संस्थेत computer operater म्हणूनही काम करत होतो. ( मध्यंतरी लग्न झाले आणि एक मुलगा सुद्धा झाला होता) त्यामुळे मला सकाळी 4 तास आणि दुपारनंतर पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी मिळायचा. आता पर्यत मी साधारणतः 50 च्या वर mpsc च्या आणि इतर क्लास 2 आणि क्लास 3 च्या exam दिल्यात. त्याच्यात काही परीक्षा मध्ये काठावरून निसटलो तर काही मध्ये Merit मध्ये आलो तर त्यावर stay आला. पण शेवटी पवित्र पोर्टल मार्फत झालेल्या शिक्षक भरती मध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून माझी नियुक्ती आता झाली आहे. सांगायचा उद्देश हा की mpsc किंवा इतर exam देत असताना तुमच्या जवळ नियोजन असायला हवे किंवा इतर दुसरा part time job तुम्ही करत असायला पाहिजे. किंवा मग आधीच ठरवून घ्यायचे की मला माझ्या आयुष्यातील एव्हढीच वर्ष फक्त ह्या exams साठी द्यायची आहे आणि त्यानंतर मी दुसरे काहीतरी बघेन. जेव्हा एक एक वर्ष असेच निघून जाते तेव्हा मनावर प्रचंड प्रमाणात दडपण वाढायला सुरुवात होते. आणि लग्न आणि त्याच बरोबर मुले झाली असतिल तर विचारूच नका. त्यावेळी असे वाटते की उगाच ह्या फंदात आपण आलो त्यापेक्षा एखाद्या कंपनीत नोकरी केली असती तर आज काहितरी हजार रुपये आपण कमाविले असते. हे सगळे मी अनुभवले आहे. त्यामुळे उगाच साधारण बुद्धय़ांक आणि साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलांनी mpsc मागे जास्त काळ वाया न घालवता आपल्याला कुठल्या तरी चांगल्या कामात गुंतवून पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. YouTube वर असलेले video हे फक्त क्लास वाल्याकडून किंवा इतर कोणाकडून पैसे कमविण्यासाठी अपलोड केलेले असतात ते पाहून आपण जरा जास्तच motivate होतो. आणि आपण एका वेगळ्याच आभासी जगात वावरायला लागतो. Exam पास होण्याची स्वप्ने पडू लागतात. एक प्रकारची नशाच आपल्याला आलेली असते. पण ही नशा जेव्हा उतरते ना तेव्हा परिस्थितीत खूप बदल झालेला असतो आपल्या सोबत असलेले साधारण मुले कंपनी किंवा स्वतः चा धंदा टाकून चांगले पैसे कमावून आपला संसार सुखाने चालवित असतात. तेव्हा कुठे जावे आणि काय करावे हेच कळत नाही. तेव्हा presence of mind ठेवुन mpsc कडे जा आणि वेळेवर परत या. पोस्ट वाचून निराश होऊ नका. योग्य नियोजन करून यश मिळवा. कोणताही जॉब छोटा नसतो त्यातून आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरायला पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि देवावर विश्वास ठेवा. सगळे योग्य वेळेस तुम्हाला मिळेल. धन्यवाद..

Advertisement

यासह पोलिस अधीक्षक प्रतिक ठुबे लिहितात की, मला नाही वाटत ! सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की स्पर्धा परीक्षा हा पदवी झाल्यानंतर जे अनेक career पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात त्यापैकी एक आहे आणि त्यामधील जागा देखील मर्यादित असतात. जर स्पर्धा परीक्षा मृगजळ असेल तर प्रत्येकच क्षेत्र मृगजळ मानले पाहिजे. स्पर्धा परीक्षा आणि इतर क्षेत्रांमध्ये मला एकच मोठा फरक जाणवतो तोः आहे की आपल्या देशातील सरंजामशाही इतिहासामुळे सरकारी नोकरींना मोठा मान दिला जातो आणि तो मान मिळवण्यासाठी बहुतांशी जण सरकारी सेवेकडे वळतात. मात्र तसे करताना विद्यार्थी हा विचार नाही करत की त्यांना जे विषय अभ्यासायचे आहेत ते विषय त्यांना आवडतात किंवा जमतात का ते ! प्रत्येक व्यक्तीचे काही बलस्थान आणि काही ही कमकुवत बाजू असतात. आपले करिअर ठरवताना या सर्व बाबींचा पुरेपूर अभ्यास करून करिअरचा पर्याय निवडणे अपेक्षित असते. मात्र सरकारी सेवेत जायचे आहे हे आधीच ठरवून अनेक जण सारासार विचार न करता स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडतात. कोणीतरी सांगितले म्हणून आपले करिअर ठरवण्यापेक्षा स्वतःला समजून घेऊन आणि स्वतःला आवडेल, रुचेल असा पर्याय निवडल्यास यश मिळण्याची शक्यता आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात आनंदी राहण्याची शक्यता जास्त असते. कोणतेही क्षेत्र कमी किंवा जास्त महत्त्वाचे नसते. देशाला अधिकाऱ्यांइतकीच चांगल्या वैज्ञानिकांची, व्यवसायिकांची, राजकारण्यांची, कलाकारांची, साहित्यिकांची गरज आहे. यापैकी आपले प्रबळ क्षेत्र कुठले हे ओळखून त्यात करिअर करणे गरजेचे आहे. आणि माझे एक स्पष्ट मत आहे की स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक वातावरण तयार करणे हे स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस साठी फायद्याचे आहे परंतु तो क्लास लावायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे आपला असतो. आपल्या निर्णयाचा दोष इतरांच्या माथी न मारता सकारात्मक पद्धतीने स्वतःला ओळखून योग्यवेळी आपल्या करिअरचा मार्ग निवडणे किंवा बदलणे आपल्या हातात असते. जाहिरात छान वाटली म्हणून आपण कुठली गोष्ट विकत घेत नाही ना, उलट त्या वस्तूचा थोडा अभ्यास करून मार्केट सर्वे करून आपण पण आपल्याला जमेल आणि आवडेल अशीच गोष्ट विकत घेतो मग स्पर्धा परीक्षेला मृगजळ ठरवून आपण काय साध्य करणार आहोत ?

Advertisement

मुंबई विद्यापीठाचे मानस जाधव लिहितात की, “मला नाही वाटत ! आतापर्यंत जेवढी उत्तरे वाचली त्यात फक्त MPSC , UPSC याच परीक्षांचा उल्लेख आहे , पण हे क्षेत्र तेवढ्यापुरते मर्यादित नाही.

Advertisement
  1. दरवर्षी IBPS मार्फत 5000+ आणि SBI 2000 जागांसाठी परिक्षा घेतली जाते.
  2. स्टाफ सिलेक्टशन कंमिशन 4000–7000 क्लास 2 आणि क्लास 3 जागांसाठी परीक्षा घेते. 2016 पासून या परीक्षांमध्ये घेतला जाणार मुलाखतीचा टप्पा वगळण्यात आला आहे त्यामुळे यश मिळण्याची शक्यता जास्त असते.
  3. RAILWAY आणि INSURANCE च्या परिक्षा होतात त्या वेगळ्या . या परीक्षा कडे का कोणी लक्ष देत नाही मान्य आहे की IAS, IPS,DC, DySP यांच्याइतक लोकांपर्यंत पोहोचुन काम करण्याची संधी या क्षेत्रात नाही पण हे देखील एक सेवा क्षेत्र आहे. आपला देश केवळ 5–6 हजार IAS IPS चालवत नाहीत तर त्यात प्रत्येक विभागाच योगदान आहे . मी याठिकाणी बँकिंग किंवा स्टाफ सिलेकशन( SSC ) परिक्षाच्या तयारीला प्रोत्साहन देत नाही , पण एक निरक्षण करा आयकर विभाग , केंद्रीय सचिवालय, अमलबजावणी संचालनालय , कस्टम कार्यालय यात किती मराठी किंवा महाराष्ट्रीयन अधिकारी काम करत आहेत ? खूप कमी . दुर्देवाने आपल्याकडे स्पर्धा परीक्षेचे कलाससेस पण या परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना देत नाहीत.
  4. आता मग मोठ्या परीक्षा मध्ये जागा कमी असतात म्हणून तयारी करायची नाही का ? तर असा अजिबात नाही सुरुवातीला वर नमूद केल्याप्रमाणे एखाद्या परीक्षेतून क्लास 2 किंवा क्लास 3 ची नोकरी घ्या आणि नोकरी करत तयारी करा . नोकरी करत करत पण खूप लोकांनी UPSC , MPSC ची तयारी केली आहे माहिती हवी असल्यास कंमेंट करा मी सविस्तर माहिती देईन . याचे 2 फायदे आहेत एक तुम्ही आर्थिकद्रीष्ट्या स्वावलंबी असाल आणि समजा उद्या नाही यश मिळालं मोठ्या परीक्षा पास होण्यात तर प्रोमोशन ने वरच्या पदावर जाऊ शकता . आयकर विभाग (INCOME TAX ) विभागामध्ये स्टाफ सिलेकशन ची परीक्षा देऊन लागलेला INCOME TAX INSPECTOR 18–20 वर्षांनंतर सहाय्यक आयुक्त होऊ शकतो जी पोस्ट UPSC मधून भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱयांना मिळते मग विचार करा वयाच्या 25 व्या वर्षी ITI झालेला विद्यार्थी 40–42 व्या वर्षपर्यंत सहाययक आयुक्त होणार नाही का ? आणि समजा दरम्यान च्या काळात तुम्ही UPSC ची परिक्षा उत्तीर्ण केली तर अतिउत्तम !!!!
  5. त्यामूळे स्पर्धा परीक्षा मध्ये अपयश आले तर एकदम SWIGGY , ZOMATO मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यापेक्षा हा पर्याय मला एकदम योग्य वाटतो.

*(अधिक माहितीसाठी पहा http://www.mr.quora.com/spardha-pariksa-he-kharokharaca-mrgajala-ahe-ka आणि यावर जाऊन चर्चा करा.)

Advertisement
Advertisement

Leave a Reply